किडनी विकाराच्या सर्व आजारांवर होणार उपचार
व्याधीने ग्रासलेल्यांना नवजीवन देण्याचे काम डॉक्टर मंडळी करत आहेत -जंगले महाराज शास्त्री
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या दिल्लीगेट येथील ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व प्रत्यारोपण रुग्ण सेवा विभागाचा लोकार्पण सोहळा ह.भ.प. वेदांताचार्य जंगले महाराज शास्त्री यांच्या हस्ते रविवारी 05 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्लीगेट येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एस.एस. दीपक, डॉ.आर.आर. धूत, किडनी विकार तज्ञ डॉ. भगवानदास कलानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने किडनी विकाराच्या सर्व आजारांवर एकाच छताखाली सेवा उपलब्ध होण्यासाठी ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोट व लिव्हर विकारा बरोबर किडनी विकार विभाग ही नव्याने कार्यान्वीत करण्यात आला आहे. या विभागाद्वारे रुग्णांना सर्व अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. यमिता साखरे यांनी दिली.
जंगले महाराज शास्त्री यांनी रुग्णसेवा ही एक प्रकारे ईश्वर सेवाच असून, व्याधीने ग्रासलेल्यांना नवजीवन देण्याचे काम डॉक्टर मंडळी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ.एस.एस. दीपक यांनी हॉस्पिटल व नव्याने सुरु करण्यात आलेल्या किडनी विकार व प्रत्यारोपण विभागाचे कौतुक करून रुग्णसेवेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
डॉ. यमिता साखरे या ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डी एम-(गॅसट्रोइंटेरोलॉजिस्ट) डॉ. राहुल जाधव यांच्या पत्नी असून, त्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ आहेत. डॉ. यामिता साखरे किडनी विकार व प्रत्यारोपण रुग्ण सेवेच्या माध्यमातून ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूग्णाना सेवा देणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने या वेळी देण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर्स, मान्यवर तसेच परिवारातील सदस्य, नातेवाईक व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.