गावातील पाण्याचे स्त्रोत सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 11 तालुक्यात केली जाणार जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- जल जीवन मिशनच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा -2 अंतर्गत गाळमुक्त धरण, गाळयुक्त व जलयुक्त शिवार या योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून साकारण्यात आलेल्या जलरथाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शास्वत स्वरूपात सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 11 तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या 4 जल रथाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून जनजागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, मृदा व जलसंधारण विभागाचे पांडुरंग गायसमुद्रे, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य आदेश चंगेडिया, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत गांधी आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यात जल रथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल. या 11 रथावर सनियंत्रणासाठी जिल्हा कक्षावर नोडल अधिकारी म्हणून जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक, तालुका पातळीवर गट विकास अधिकारी तसेच शासन नियुक्त प्रतिनिधी जिल्हा व तालुका पातळीवर रथाचे नियोजन करणार आहेत.
गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स, गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांना प्रसिध्दी पत्रके दिले जाणार आहेत. तसेच नियुक्त केलेल्या समन्वयकामार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करता येणार आहे. शासनाची ही योजना गाव पातळीवर पोहचविण्यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला आहे.