• Tue. Nov 4th, 2025

शहरात औद्योगिक उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

ByMirror

Oct 17, 2023

एम.एस.एम. ई. विकास आणि सुविधा कार्यालय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचा संयुक्त उपक्रम

औद्योगिक क्षेत्राचा विकास त्या शहराच्या सर्वांगीन विकासाचा पाया ठरतो -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- औद्योगिक क्षेत्राचा विकास हा त्या शहराच्या सर्वांगीन विकासाचा पाया ठरतो. मोठ-मोठी शहरांचा औद्योगिकरणाने विकास झाला. अहमदनगर एमआयडीसीच्या विकासाच्या दृष्टिकोनाने सकारात्मक पावले उचलली जात आहे. भौगोलिक दृष्टया उत्तम व पायाभूत सुविधांचा समावेश असलेल्या या जिल्ह्यात औद्योगिकरणाला चांगले भवितव्य असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


शहराच्या औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी एम.एस.एम. ई. विकास आणि सुविधा कार्यालय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर या औद्योगिक संस्थेच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावरील संजोग लॉन येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय उद्योजक आणि व्यावसायिकांच्या औद्योगिक उत्पादनांचे प्रदर्शन व व्याख्यानाचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अहमदनगर शाखेचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे, क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे इंद्रनील धनेश्‍वर, एमएसएमई मुंबईचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार, प्रकाश गांधी, हरजितसिंह वधवा, राजेश पेवाल, दिपाली टकले, प्रशांत मुनोत, विशाल गांधी, दिलीप कर्नावट, विजय इंगळे, प्रशांत जोगलेकर, सतीश जोशी, प्रदीप बागुल आदींसह उद्योजक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, नगरच्या दृष्टिकोनाने एमआयडीसीमध्ये क्रॉम्प्टन व एल ॲण्ड टी सारखे मोठे युनिट औद्योगिक क्षेत्राला चालना देत आहे. या दोन्ही युनिटचे प्रमुख नगरच्या मातीतले असल्याने शहराच्या विकासाला देखील चालना मिळत आहे. कंपनीच्या सीआर फंडातून मोठे विकास कामे होण्यास मदत होत आहे. शहरा जवळ असलेले शिर्डी विमानतळ, शहराशी जोडलेले अनेक राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे सुविधांमुळे औद्योगिक विकासाला पोषक वातावरण आहे. औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते. बेरोजगार युवकांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा ठरणार आहे. एमआयडीसी येथे बंद पडलेल्या आयटी पार्कला चालना देऊन आयटी क्षेत्रातील कंपन्या नगरमध्ये आणून युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न देखील सोडविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


अरविंद पारगावकर म्हणाले की, मोठी शहरे औद्योगिक विकासाच्या धर्तीवर झपाट्याने वाढली. अहमदनगर शहराला औद्योगिक विकासाची मोठी संधी असून, आपले शहर देखील भविष्यात औद्योगीकरणासाठी नाव रूपास येणार आहे. यासाठी औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. या प्रदर्शनातून औद्योगिक क्षेत्राला चालना देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


अतुल दवंगे यांनी उद्योग वाढीसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. यामुळे नवउद्योजकांना चालना मिळणार असून, विविध उद्योग व्यवसायाची एकमेकांना माहिती होणार असल्याचे सांगितले. इंद्रनील धनेश्‍वर यांनी उद्योग व्यवसायसाठी जगभर फिरताना व उद्योग उभे करताना आलेले अनुभव व क्रॉम्प्टन कंपनीच्या यशस्वी वाटचालीची त्यांनी माहिती दिली. अभय दापटकर यांनी भविष्यातील औद्योगिक क्षेत्राच्या संधी, शहर विकासाच्या दृष्टिकोनाने औद्योगिक क्षेत्राचा वाटा व सरकारच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले.


प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी औद्योगिक क्षेत्रातील विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाची पहाणी केली. तर प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी भारतीय संरक्षण क्षेत्रात काम करणारे प्रादेशिक तंत्रज्ञान नोड, हेड कवाटर्स सदर्न कमांड, माझगाव डॉक लिमिटेड, टाटा नेक्सार्क, श्‍नायडर इलेक्ट्रिक, सी.जी. पॉवर ॲण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमिटेड, इंडियन सिमलेस मेटल ट्युबस लिमिटेड, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड यांसारख्या नामांकित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी व्हेंडर डेव्हलपमेंट विषयावर मार्गदर्शन केले. सर्वांसाठी खुले असलेले प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांसह उद्योजकांचा प्रतिसाद मिळत आहे.


या प्रदर्शनाचे प्रायोजक आयक्यूएसचे महेंद्र पाठक व बँक ऑफ महाराष्ट्राचे झोन मॅनेजर शशांक साहू यांचा सत्कार करण्यात आला. तर 2024 मध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन घेण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माणकेश्‍वर यांनी केले आभार प्रकाश गांधी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *