शहरात जातीयवादी पक्षांनी हिंदू-मुस्लिम द्वेषाचे राजकारण करून सत्ता भोगली -किसन चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोठला, राज चेंबर येथील वंचित बहुजन आघाडीच्या शहर संपर्क कार्यालयाचे शुभारंभ राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, महासचिव अमर निरभवणे, भिंगार शहराध्यक्ष जे.डी. शिरसाठ, उपाध्यक्ष राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, प्रदीप भिंगारदिवे, सिद्धार्थ पवार, किरण गायकवाड, अनिल भिंगारदिवे, आबिद शेख, अन्वर शेख, अहमद सय्यद, हेमंत पुरी आदी उपस्थित होते.
किसन चव्हाण म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी हा विस्थापितांचा पक्ष असून, दुर्लक्षीत घटकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे. देशातील राजकारणात मुस्लिम, ओबीसी, दलित व आदिवासींचा फक्त मतांसाठी वापर करण्यात आला, मात्र वंचित बहुजन आघाडी माध्यमातून या समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम सुरु आहे. शहरात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, जातीयवादी पक्षांनी हिंदू-मुस्लिम द्वेषाचे राजकारण करून सत्ता भोगली. वंचित बहुजन आघाडी सर्व समाजाला सन्मानपूर्वक बरोबर घेऊन चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीच्या शहर संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य व दुर्बल घटकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. नागरिकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी हक्काने या कार्यालयाचा उपयोग होणार आहे. हे राजकीय कार्यालय नसून जनसेवेचे कार्यालय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.