रेल्वे स्टेशन रोड येथील गायके मळा ते लिंक रोडच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन
काही वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी; रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडले जाणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रोड, गायके मळा ते लिंक रोडला जोडणाऱ्या व नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. काही वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी होणाऱ्या अडचणीपासून सुटकेचा निश्वास सोडला असून, या रस्त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडला जाणार आहे.
भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर, विशाल खैरे व विजय गायकवाड यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सदर रस्त्यासाठी पाठपुरावा करुन रखडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लावले. रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी विजय गायके, सतीश भागवत, सुभाष चौभे, सचिन शहाणे, बालाजी काळे, अशोक काळे, ऋषभ गांधी, सुनील वैराळ, सुरेश नीरभवणे, रमाकांत दिवटे, भगवान घाटमाळ, खामकर, कर्डे, गांधी, पिंपळे, पूजा दिवटे, मोने ताई, गांधी मॅडम आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. अभय आगरकर म्हणाले की, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत. रेल्वे स्टेशन रोड परिसरातील प्रभाग 15 मध्ये अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून होत आहे. काही वर्षातच या परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. अंतर्गत रस्त्यांचे काम मार्गी लावून व ओपन स्पेस विकसीत केले जाणार आहे. भाजपचे खासदार व पालकमंत्री यांनी शहरात विकासाची उपलब्धी करुन दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दत्ता गाडळकर म्हणाले की, नगरसेवक पद नसताना देखील केवळ नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने पाठपुरावा करुन प्रभाग 15 मध्ये मोठ्या प्रमाणात खासदार विखे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला आहे. अनेक प्रश्न सोडविण्याचे काम सुरु आहे. नागरिकांनी देखील काम करणाऱ्या लोकांच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. या परिसरातील अनेक अंतर्गत रस्ते झाले असून, प्रलंबीत प्रश्न देखील मार्गी लावण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
गायके मळा ते लिंक रोड हा अतिशय दुर्लक्षीत राहिला रस्ता होता. या रस्त्यांची नागरिकांना नितांत आवश्यकता भासत होती. तर खराब रस्ता असल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असल्याचे विशाल खैरे यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच रस्ता होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
