वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणताही गोंधळ झालेला नसल्याचा संचालक मंडळाचा खुलासा
विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या अभ्यासिका व ग्रंथालयाच्या उपक्रमाचे सभासदांकडून स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत मोजक्या विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची दारे उघडे करुन देणाऱ्या पतसंस्थेच्या अभ्यासिका व ग्रंथालयाबद्दल खोटी व संस्थेच्या संचालक मंडळाची बदनामीकारक बातमी वृत्तपत्रांमधून प्रसिध्द करुन विरोधक सभासदांचे दिशाभूल करत असल्याचा खुलासा पतसंस्थेचे चेअरमन नारायण कोडम व व्हाईस चेअरमन विनायक मच्चा यांनी केला आहे. तर पतसंस्थेच्या बदनामीबद्दल न्यायालयीन कार्यवाही सुरु करण्यात आली असून, सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
विद्यमान संचालक मंडळाने पतसंस्थेच्या माध्यमातून श्री मार्कंडेय अभ्यासिका व ग्रंथालयाची मागील वर्षी उभारणी केली. या अभ्यासिकेत विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, शासकीय व इतर नोकरीसाठी असलेल्या परीक्षांची तयारी करत आहेत. अत्यंत कमी शुल्कात विद्यार्थ्यांना अद्यायावत अभ्यासिका व ग्रंथालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या अभ्यासिकेत दीडशे मुले-मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. तर अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश देखील संपादन केले आहे. या चांगल्या उपक्रमास रमेश नागुल, दत्तात्रेय जोग, राजेंद्र म्याना, नारायण न्यालपेल्ली, सुरेखा आडम, प्रवीण कोडम, गोरख गाली आदींनी विरोध दर्शवून वृत्तपत्रांमध्ये बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध केल्याचा संस्थेच्या वतीने आरोप करण्यात आला आहे.
श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा मार्कंडेय संकुल येथे पार पडली. सभेत सभासदांनी उपस्थित राहून चर्चेत भाग घेतला. अनेकांनी चर्चेसाठी अर्ज केले ते होते, अर्ज केले त्यांनी प्रश्न वाचून सांगितले. काहींना स्वतःचा अर्ज वाचायला अडचण होती. अशा सभासदांना वाचनास प्रकाश कोटा यांनी सर्वांची संमती घेऊन अर्ज वाचन केले. सर्व प्रश्नावर कायदेशीर समाधानकारक उत्तरे दिली गेली. सर्व सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास व्यक्त करुन सभेतील सर्व विषयांना बहुमताने मंजूरी दिली.
संस्थेचे 2272 सभासद असून, मोजके पाच-सहा विरोधकांनी संस्थेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. 20 लाखाचा जो मुद्दा घेऊन विरोधक संस्थेची बदनामी करत आहे, हा मुद्दा कायदेशीर आहे. तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच चांगल्या सूचनांचे स्वागत सुद्धा होईल असे संचालकांनी सांगितले आहे.
या सभेत 10 टक्के लाभांश ठराव सर्वानुमते मंजूर झाला व विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर झाले आहे. या सभेत कोणताही गोंधळ झालेला नाही, सभेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अधिकृत पोलीस बंदोबस्त होता. वार्षिक सर्वसाधारण सभा योग्य रित्या पार पडली असल्याचे स्पष्टीकरण संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.
वास्तविक अभ्यासिका संदर्भात नोंदणी व घटना तसेच कर्ज वितरण बाबत खरेदीपत्र तपशीलासह सभेमध्ये कागदपत्रे सादर करून सभासदांना माहिती देण्यात आली. सध्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक असल्याने सदर विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने जाणीवपूर्वक संस्थेबद्दल खोटी बातमी प्रसिद्ध करून संस्थेची बदनामी करत आहे. परंतु संस्थेचे सभासद निवडणुकीमध्ये सदर इच्छुक उमेदवारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे संचालक मंडळाने म्हंटले आहे.
प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक संचालक बालराज सामल यांनी केले. व्यवस्थापक आशिष बोगा यांनी अहवालाचे वाचन करून विषय पत्रिका नुसार संस्थेचे कामकाज सुरू केले. संचालक मंडळाने राबविलेल्या अभ्यासिका व ग्रंथालय या उपक्रमाचे सर्व सन्माननीय सभासदांनी कौतुक केले.
