• Sun. Nov 2nd, 2025

लोकसभा निवडणुकीत लोकभज्ञाक तत्वज्ञानाने सत्तापेंढारी आणि धर्ममंडूक चारीमुंड्या चित

ByMirror

Jun 12, 2024

विधानसभा निवडणुकीत पुन्हा लोकभज्ञाक चळवळ यशस्वी करण्याचा इशारा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाहीच्या मध्यममार्गी शहाणपणामुळे लोकसभा निवडणुकीत देशातील सत्तापेंढारी आणि धर्ममंडूक चारीमुंड्या चित झाले असून, भारतीय संविधानातील अस्सल लोकभज्ञाक तत्वज्ञानाचा विजय झाला असल्याचा दावा लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. तर पुन्हा राज्यात विधानसभा निवडणुकीत लोकभज्ञाक चळवळ यशस्वी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


मागच्या दाराने सत्ता काबीज करण्यासाठी शंभर-दोनशे गुंड पाळून पोसायचे आणि निवडणूकीमध्ये पैशाचा पुर आणून मतं खरेदी करायचे, दहशत माजवायची, विरोधकांची फोडाफोडी करायची अशा कुटनितीचा वापर राजकारणात सर्रास सुरु आहे. निवडून आल्यावर पुढील पाच वर्षे घर भरायचे, ही बाब लोकांना पटली नाही.

लोकांबाबतची भक्ती नाही, एकात्मिक ज्ञान सिद्धांताचा गंध नाही, त्यातील तंत्राच्या काठावर देखील नसणारे आणि लोककल्याणासाठी आणि निसर्ग कल्याणासाठी जुजबी कामसुद्धा नसणारे लोक पुढील पाच वर्षे सत्ता पेंढाऱ्याच्या तोऱ्यात सत्ता उपभोगतात आणि मतदाराला मतशुन्यावर आणतात.गुंडांच्या मदतीने मतदारांची नांगी पाच वर्षे ठेचत असतात. पोलीस आणि कायदा अधिकाऱ्यांवर दहशत करून राबवतात, परंतू आता देशाच्या 75 वर्षानंतर देशात लोकभज्ञाकशाहीची पहाट झाली आहे. त्यामुळे लोककल्याण आणि निसर्गकल्याण या दोनच बाबी जनतेच्या अजेंड्यावर राहिल्या आहेत. भारतीय संविधानाचा लोकभज्ञाक हा मुळ गाभा आहे, त्यातून लोककल्याण आणि निसर्गकल्याण या दोन्ही मार्गांचा समन्वय करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


मी पुन्हा येईल, अबकी बार चारसो पार, राम मंदीराला बाबरीची मस्जिदची कुलूपं लावण्याची भोकाडी, चार कोटी लोकांना घरे दिल्याची खोटी आकडेवारी आणि देशावर धर्माचा रणगाडा फिरविण्याची आणि देशात हिंदू राष्ट्र आणण्याची भाषा भारतीयांच्या पचनी पडली नाही. भारत हा मध्यममार्गी शहाणपणा राबवणारा देश आहे, ही बाब देशातील निवडणूक निकालून स्पष्ट झाली आहे. पाकिस्तान, चीन, रशिया अशा अतिरेकी-विस्तारवादी विचारसरणीच्या देशांना जगाने मान्यता दिली नाही, त्यामुळे भारतीय मानसशास्त्र व तत्वज्ञानावर आधारित आणि पाश्‍चिमात्य लोकांचा सम्यक भौतिकवाद यांच्या संकरातून तयार झालेले लोकभज्ञाक आणि निसर्गभज्ञाक जनतेला भावले आहे. त्याची प्रचिती भारतीय लोकशाहीने जगाने दाखविली असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती राबविणाऱ्या उमेदवारांना आणि पक्षांना मतदार बहुमत देतील. त्यामुळे ज्यांची सत्तापेंढारी म्हणून गणना आहे, त्यांना देखील देशातील राजकीय पक्षांनी थारा देऊ नये असे आवाहन लोकभज्ञाक चळवळीने केले आहे. सत्तापेंढारी म्हणून नाणाववेल्या सर्वांनाच मतदारांनी मोडीत काढले.लोकभज्ञाक तत्वज्ञान विस्तारीत होण्याला स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे खर्च झाली, इंग्रज देशाबाहेर काढण्यासाठी 150 वर्षे लागली त्यामुळे जात, धर्म, पंथ, प्रादेशिकवाद, पैसा यांच्या जोरावर शिरजोर झालेल्या सत्तापेंढाऱ्यांना मुठमाती देण्यासाठी पुढील 75 वर्षे वाट पाहणे म्हणजे मुर्खपणाचे ठरेल, असा इशारा लोकभज्ञाक चळवळीने दिला आहे.

लोककल्याणकारी कायद्याच्या माध्यमातून लोककल्याण आणि निसर्गकल्याण साधण्याची किमया लोकभज्ञाक तंत्रात आहे. त्यामुळे लोकांनी उघड्या डोळ्यांनी आणि विचारपुर्वक आणि 5 हजार वर्षे सत्यावर तगलेल्या सर्वकल्याणकारी लोकभज्ञाक शासन पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. यातूनच भारत हा अव्वल प्रथम दर्जावर राहू शकेल, असा विश्‍वास लोकभज्ञाक चळवळीने व्यक्त केला. लोकभज्ञाक तत्वज्ञान राबविण्यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरूडे, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, ओम कदम, वीर बहादूर प्रजापती आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *