अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे विधानसभा अध्यक्षांसह आमदार लंके व झिरवळ यांना निवेदन
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कारवाईस दिरंगाई करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी चौकशी अहवाल तयार होऊन देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) कारवाई करत नसल्याने कारवाईसाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रश्न उपस्थित करण्याचे निवेदन विधानसभा अध्यक्ष, आमदार निलेश लंके व आमदार नरहरी झिरवळ यांना पाठविण्यात आली असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली आहे.
पारनेर पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी अनेक कामात मोठ्या प्रमाणात अनिमितता केली आहे. त्याबाबत 16 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार अर्ज करून अनेक वेळा उपोषण करून चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल मिळण्याकरिता माहितीचा अधिकार वापरावा लागला. जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) दिरंगाई करुन अपहार करणाऱ्या त्या गटविकास अधिकारीला पाठिशी घालत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अर्थ विभागाने ग्रामपंचायत विभागाला अहवाल सादर करून आज अखेर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे भ्रष्टाचार वाढत चालला असून, कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. पारनेर पंचायत समितीचा अहवाल येऊन देखील कारवाई होत नसल्याची बाब गंभीर स्वरूपाची असून, हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करुन जबाबदार अधिकारी व कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.