• Tue. Jan 6th, 2026

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पुन्हा ‘लिंबू-टोना’चा संशय;

ByMirror

Jan 6, 2026

रेल्वे स्टेशनच्या आनंदनगर परिसरात भीतीचे सावट


सीसीटीव्हीत लिंबू टाकणारा पुरुष-महिला कैद


अज्ञात टोळ्यांकडून मुला-मुलींना धमक्या; नागरिकांची पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना शहरातील वातावरण आधीच तापलेले असतानाच, आता लिंबू-टोना व संशयास्पद हालचालींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण कॉलनीत खळबळ उडाली आहे.


मागील काही दिवसांपासून आनंदनगर परिसरातील विविध ठिकाणी लिंबू आढळून येत असून, यामागे अंधश्रद्धा किंवा जादू-टोना प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एका दुचाकी वाहनावर एक पुरुष व एक महिला येऊन रस्त्यावर व घरांच्या आसपास लिंबू टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


दरम्यान, स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विना क्रमांकाच्या नंबर प्लेटच्या दुचाकीवरून काही युवक परिसरात येऊन नागरिकांना धमकावत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या प्रकारात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासोबतच, गेल्या 10 ते 15 दिवसांपासून रात्री 8 वाजल्यानंतर आनंदनगर व स्टेशन रोड परिसरात 5 ते 6 अज्ञात इसम टोळ्यांच्या स्वरूपात फिरताना दिसत आहेत. हे इसम तोंडाला रुमाल बांधून फिरत असून, लहान मुले व मुलींना धमकावणे, पळवून नेण्याची भीती दाखवणे, तसेच मध्ये कोणी हस्तक्षेप केल्यास जिवे मारण्याची धमकी देत असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत.


या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे आनंदनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत आहेत. महिलाही सायंकाळी किंवा रात्री घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. याच परिसरात अलीकडे घरफोडी व लुटमारीच्या घटनाही घडल्याचे समोर आले असून, नागरिकांची असुरक्षितता अधिक वाढली आहे.
नागरिकांच्या मते, या सर्व प्रकारांवर तातडीने नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आनंदनगर व स्टेशन रोड परिसरात पोलीस गस्त वाढविणे, संशयित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींना अटक करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *