गणराज प्रकाशनाचे कार्य समाजाभिमुख -डॉ. रवींद्र शोभणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तम आणि सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीतून सामाजिक जीवनाच प्रतिबिंब उमटत असते. ते लेखनातूनही प्रगट होणे गरजेच असते. असे समाजाभिमुख लेखन सामाजिक परंपरा व संस्कृतीचे जतन करण्याचं काम करतात. गणराज प्रकाशन संस्था अनेक वर्षापासून प्रकाशन क्षेत्रात काम करत असून, त्यांनी आजवर अनेक दर्जेदार ग्रंथ प्रकाशित केले आहेत.
त्यामुळे मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्यात प्रकाशनाचा मोलाचा वाटा आहे. साहित्य आणि समाज याचा मेळ त्यांनी घातला असून गणराज प्रकाशनाचे कार्य समाजाभिमुख असल्याचे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
अमळनेर (जळगाव) येथे संपन्न झालेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गणराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या व लेखक प्रा. डॉ. रामदास टेकाळे लिखित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वाटचाल व दृष्टिक्षेप या संशोधन ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डॉ. रवींद्र शोभणे बोलत होते. यावेळी साहित्य संमेलनाचे उद्घाटक तथा लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, गिरीश महाजन, महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्यवाह सुनिताराजे पवार, लेखक डॉ. रामदास टेकाळे, प्रकाशक प्रा. गणेश भगत, संदीप पानमळकर उपस्थित होते.
लेखक प्रा. डॉ. रामदास टेकाळे यांनी हा संशोधनात्मक अनोखा ग्रंथ लिहिला असून या ग्रंथामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने तसेच इतर पूरक संमेलने, आदी विषयी सांगोपांग संशोधनात्मक, समग्र चर्चा करणारा एकमेव अप्रतिम असा ग्रंथ सिद्ध केला आहे.
तो अहमदनगर येथील गणराज प्रकाशनाने प्रकाशित केला असून, प्रकाशनाचे हे 290 वा ग्रंथ असून प्रकाशनाने आजवर अनेक प्रथितयश व नवोदित लेखकांना विचारपीठ उपलब्ध करून दिले आहे. साहित्यिक उपक्रम राबविले आहेत, त्यामुळे साहित्य संमेलनात प्रकाशन सोहळा मंडपात हा ग्रंथ सर्व साहित्यिकांच्या पसंतीचा आकर्षक ग्रंथ ठरला. अमळनेर येथे ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांनी लेखक व प्रकाशकांना शुभेच्छा दिल्या.
