वंचित मुलांसह दीपोत्सव उत्साहात साजरा
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब व घर घर लंगर सेवेचा सयुंक्त उपक्रम
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर व घर घर लंगर सेवेच्या सयुंक्त विद्यमाने सलग सतराव्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात वंचित घटकातील मुलांसह दिवाळी साजरी करण्यात आली. रांगोळ्यांनी सजलेले अंगण, लखलखत्या पणत्यांचा झगमगाट, फटाक्यांची आतषबाजी व आकाश दिव्यांनी उजळलेले आसमंत तर संगीताच्या तालावर ठेका धरत वंचित घटकातील मुला-मुलींनी दिवाळीचा आनंद लुटला. मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या दीपोत्सवात स्नेहालयासह बालभवन मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हास्य कलाकार दिलीप हल्याळ, डॉ. एस.एस. दीपक, श्यामसेठ सारडा, शरद मुनोत, मोहनसेठ मानधना, हरिष हरवाणी, लायन्सचे अध्यक्ष धनंजय भंडारे, खजिनदार नितीन मुनोत, लिओच्या अध्यक्षा आंचल कंत्रोड, सचिव धारवी पटेल, प्रकल्प प्रमुख हरजितसिंह वधवा, किरण भंडारी, हरमनकौर वधवा, युक्ती देसर्डा, स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी, आदेश चंगेडिया, बाबूशेठ बोरा, घर घर लंगर सेवेचे जनक आहुजा, राजेंद्र कंत्रोड, हनिफ शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी वंचित घटकातील मुलांसमवेत दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दरवर्षी दीपोत्सवचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवाचे सतरावे वर्ष असून, लायन्स क्लब मधील प्रत्येक सदस्य सेवाभावाने स्वतःला झोकून समाज घडविण्याचे कार्य करत आहे. या सेवा कार्यात लिओच्या युवक-युवतींनी देखील सामाजिक भावनेने योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. वंचितांचे आनंद द्विगुणीत करण्यासाठी सलग सतरा वर्ष अविरतपणे दीपोत्सव घेतल्याबद्दल स्नेहालयाच्या वतीने आयोजकांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. एस.एस. दीपक म्हणाले की, वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हा खरा दिवाळीचा आनंदोत्सव आहे. या दीपोत्सवाने जीवनात वेगळा आनंद मिळत असल्याचे सांगून, त्यांनी एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले. मोहनसेठ मानधना यांनी एवढ्या वर्षापासून वंचितांसाठी साजरा केला जाणारा दीपोत्सव कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड लायन्स व लंगरसेवेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी कौतुक केले. श्यामसेठ सारडा यांनी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने आरोग्य शिबिर राबविण्याचे आश्वासन दिले. गिरीश कुलकर्णी यांनी वर्षभर स्नेहालयातील मुले दीपोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. वर्षभराची प्रेरणा देणारा हा दीपोत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांनी नवरा बायकोचे विनोद व जीवनातील विविध प्रसंग सांगून दिलखुलास हसविले. तर आनंदी व तणावमुक्तीसाठी हास्याचे महत्त्व विशद केले. प्रारंभी स्नेहालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रम रंगात आल्यावर डिजेच्या तालावर बालगोपालासह उपस्थित पाहुण्यांनी गीतांवर ठेका धरला होता. या मेळाव्यात मुलींनी हातावर मेहंदी, मुलांनी टॅटू काढून विविध खेळांचा आनंद लुटला.

यावेळी घेण्यात आलेल्या किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आले. संध्याकाळी स्नेहालय परिसरात लावण्यात आलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने लखलखाट झाला होता. तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाले. या धमालमय कार्यक्रमासह विद्यार्थ्यांना वडा पाव, खाऊ, चॉकलेट, आईस्क्रिमसह भोजनाची मेजवानी होती. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी स्नेहालयचे श्यामा असावा, सपना असावा, प्रविण मुत्त्याल, संगीता सानप, समाधान धालगडे, चंद्रकांत शेंबडे, अनिता शिखरे, योगिता शिंदे, उषा खोल्लम, सुहासिनी मासुळकर, गिरीश अगरवाल आदींसह आरोग्य आधार व कुष्ठधाम ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती शुक्रे यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्सचे आनंद बोरा, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, प्रशांत गाडेकर, सिमरनकौर वधवा, प्रणिता भंडारी, भावना छाजेड, अर्पिता शिंगवी, सतीश बजाज, गुरनूरसिंह वधवा, रुचिता कुमार, लंगर सेवेचे प्रितपालसिंह धुप्पड, कैलाश नवलानी, सुनिल थोरात, राजू जग्गी आदींसह घर घर लंगर सेवा, स्नेहालय परिवार, बालभवन व बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.