माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा समारोप
नवनाथ विद्यालय, डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महात्मा गांधीजी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पर्यावरणास घातक ठरत असलेल्या व निरोगी आरोग्यासाठी शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संकल्प केला. माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्राच्या निर्देशानुसार संस्थेच्या वतीने स्वच्छतेवर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
नवनाथ विद्यालयात कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, मयुरी जाधव, प्रशांत जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, सेवाकर्मी निलेश थोरात, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त मंदाताई डोंगरे, लहानबा जाधव आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्लास्टिक मुक्ती व स्वछतेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे विचार अंगीकारण्याचे सांगितले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्ती व सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून, अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत आहे. प्रत्येकाने स्वच्छतेचा व प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर यांनी स्वच्छतेची सार्वजनिक स्वच्छता व प्लॅस्टिक बंदीसाठी स्वत: पासून सुरुवात करण्याची गरज आहे. सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक संकल्प शुक्ला, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, सुनील धारुडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
