शिक्षक परिषदेची मागणी; शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना निवेदन
मार्च 2025 अखेरच्या पीएफ स्लिपसाठी विशेष कॅम्प घ्या -बाबासाहेब बोडखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना अद्यापही प्रमाणपत्रे न मिळाल्यामुळे त्यांच्या वेतनवाढीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. तसेच मार्च 2025 अखेरपर्यंतच्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) पावत्या मिळालेल्या नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.
शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आणि वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांना निवेदन दिले. यावेळी महावीर धोदाड, प्रसाद सामलेटी, निलेश बांगर, शिक्षकेतरचे सचिव गोवर्धन पांडूळे, प्रा. अमोल क्षीरसागर, अशोक सोनवणे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
2 ते 12 जून 2025 या कालावधीत पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता सेवांतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने हजेरी चाचणी घेण्यात आली. वेळेचे बंधन असल्यामुळे उशिरा आलेल्या काही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणातून बाद करण्यात आले. मात्र, प्रशिक्षण पूर्ण करून सर्व टप्पे स्वाध्याय वही, संशोधन अहवाल इत्यादी सादर करून जवळपास तीन महिने उलटून गेले तरी अद्याप प्रमाणपत्रे वितरित झालेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांना वेतनोन्नतीचा लाभ मिळत नाही.
जिल्ह्यातील सर्व शाळांना सन 2021-22 सालापर्यंतच्या पीएफ स्लिप मिळाल्या आहेत. त्यानंतर सन 2021-22 मध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पीएफ खाती विशेष कॅम्पद्वारे ऑनलाईन अपडेट केली असली तरी 2022-23, 2023-24 व 2024-25 या तीन वर्षांच्या स्लिप मिळालेल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना कर्ज घेण्यास मोठा अडथळा येत आहे. केवळ 2021-22 पर्यंतच्या रकमेवरच कर्ज मंजूर केले जात असल्याने अनेक कर्मचारी नाराजी व्यक्त करत आहेत. शिक्षक परिषदेने मार्च 2025 अखेरच्या स्लिप ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने विशेष कॅम्पद्वारे सर्वांना तात्काळ देण्याची मागणी केली आहे.
शिक्षक परिषदेने जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुरवणी देयके, वैद्यकीय देयके, तसेच निवृत्त झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरणाचे प्रलंबित देयके तात्काळ मंजूर करावीत, अशी मागणी केली आहे. यासोबतच प्रलंबित वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रस्तावही मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रमाणपत्र संदर्भात संगमनेर डायटचे प्राचार्य राजेश बनकर यांच्या संपर्क साधला असता, त्यांनी सप्टेबर महिन्याच्या अखेर पर्यंत वरिष्ठ व निवडश्रेणीच्या सर्व प्रशिक्षणार्थींचे प्रमाणपत्र प्रत्येक तालुक्यानुसार वाटप करण्याचे आश्वासन शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.
