पर्यावरण संवर्धनासाठी हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना रोपांचे वाण
महिलांनी उभे केलेले सामाजिक कार्य क्रांतीचे पाऊल -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया लिनेस क्लब अंतर्गत एमएच 3 गोदातरंग मधील उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या क्लबच्या पीएसटी प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर व कॅबिनेट ऑफिसर यांचा गौरव करण्यात आला. लिनेस क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी एकत्र आलेल्या महिलांचा हळदी-कुंकूचा कार्यक्रम देखील रंगला होता. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणासाठी महिलांना वाण म्हणून रोप देण्यात आले. या डिस्ट्रिक्ट क्लब मध्ये 15 क्लब असून, 72 अवॉर्ड देण्यात आले.
हॉटेल संजोग लॉन्स येथे झालेल्या लिनेसच्या विराज्ञी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून चार्टर्ड बहुप्रांतीय अध्यक्षा डॉ. वर्षाताई झंवर, माजी बहुप्रांतीय अध्यक्षा अंजलीताई विसपुते, गोदातरंगच्या प्रांताध्यक्षा लतिकाताई पवार, माजी प्रांत अध्यक्षा छायाताई राजपूत, सचिव अमल ससे, खजिनदार जया भोकरे, हेमा गिरधानी आदी उपस्थित होत्या.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी गणेश वंदना सादर करण्यात आली. प्रास्ताविकात लतिकाताई पवार म्हणाल्या की, सर्व महिलांनी एकत्र येऊन लिनेसच्या माध्यमातून सेवाकार्याची ज्योत प्रज्वलीत केली आहे. गरजूंना आधार देऊन समाजातील अंंधकार दूर करण्याचे काम ही ज्योत करणार आहे. लिनेसच्या माध्यमातून सर्व गरजू व आर्थिक दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम सुरु आहे. समाजकार्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी व गरजू घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महिलांनी उभे केलेले सामाजिक कार्य क्रांतीचे पाऊल आहे. त्यांनी उभे केलेले सामाजिक कार्य छोटे नसून, हे परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील महिलांचे सक्षमीकरण होत असताना, सामाजिक कार्यासाठी पुढे आलेल्या सक्षम महिलांच्या माध्यमातून इतर महिलांना आधार मिळणार आहे. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी महिला सशक्तीकरणाची गरज असून, या दिशेने राज्यसरकारचे पाऊन लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पडले आहे. छोट्या-छोट्या सामाजिक कार्यातून मोठे कार्य घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. वर्षाताई झंवर म्हणाल्या की, वंचितांच्या सेवेतच जीवनाचे खरे समाधान दडले आहे. सेवेतून जीवनात आनंद निर्माण होतो. या समाज कार्यात मोठ्या संख्येने महिलांना जोडून परिवर्तनाच्या दिशेने कार्य सुरु आहे. वंचितांना आधार देण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर उत्कृष्ट कार्याने सन्मान झालेल्या क्लबच्या महिलांचे त्यांनी अभिनंदन केले.
खजुराव येथे झालेल्या ऑल इंडिया समर्पण कॉन्फरन्स मध्ये व नागपूर येथील भंडारा सन्मान सोहळ्यात उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष म्हणून लतिकाताई पवार यांना अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम परदेशी यांनी केले. आभार जयाताई भोकरे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.