भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश
रूपाली बिल्ला ठरली रात्र प्रशालेतून राज्यात प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत मासूम संस्थेने जाहीर केलेल्या राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या रात्र शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. भाई सथ्था नाईट हायस्कूल मध्ये झालेल्या गुणगौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष ॲड. अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, रात्र शाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, रात्र शाळेचे प्राचार्य सुनील सुसरे उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. पारस कोठारी म्हणाले की, रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणाऱ्या मासुम संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यातील रात्र शाळेतील दहा गुणवंत विद्यार्थी निवडले जातात, यामध्ये चार विद्यार्थी आपल्या रात्र प्रशालेचे असून, हे सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्वात मोठी रात्रप्रशाळा म्हणून या शाळेने मासूम संस्थेच्या मूल्यांकनात प्रथम स्थान मिळविले असून, अद्यावत शिक्षण व उच्चशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाहुण्यांच्या हस्ते मासूम संस्थेने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी बोर्डात राज्याच्या गुणवत्ता यादीत रात्र प्रशालेमध्ये राज्यात प्रथम आलेली रूपाली बिल्ला, राज्यात चौथी शारदा मंगलपेल्ली, राज्यात पाचवा चेतन घोडके व राज्यात नववा वैष्णवी जोशी या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शैलेंद्र घाष्टे मुंबई यांच्याकडून रूपाली बिल्ला हिला रोख स्वरूपात 1500 रुपये व शारदा मंगलपेल्ली हिला 1000 रुपये बक्षिस स्वरूपात देण्यात आले. योगिता गावकरे समाजअभ्यास विषयात राज्यात प्रथम, शारदा मंगलपेल्ली विज्ञान विषयात राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल शैलेंद्र घाष्टे मुंबई यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक गजेंद्र गाडगीळ व शिवप्रसाद शिंदे यांना देखील स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तर यावेळी शाळेत प्रवेशित विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनाने बसविण्यात आलेल्या तक्रार पेटीचे अनावरण करण्यात आले. तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समितीच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.
शिरीष मोडक म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या यशाला तोड नाही. विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीत वाट काढून यश मिळवले आहे. राज्यातील रात्र शाळेच्या प्रथम दहा मध्ये चार विद्यार्थी व विषय दोन विद्यार्थी प्रथम येण्याचा बहुमान संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. पुढील वर्षी यापेक्षा अधिक विद्यार्थी राज्यात चमकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲड. अनंत फडणीस म्हणाले की, दिवसभर काम करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे यश उल्लेखनीय आहे. रात्रशाळेच्या माध्यमातून अनेकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. यापुढेही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, शिक्षण थांबवू नका, उच्चशिक्षणासाठी संस्था पाठिशी असल्याचे अभिवचन त्यांनी दिले.
अजितशेठ बोरा यांनी मासूम संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे कौतुक करुन, त्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचे या यशातून चीज झाले आहे. जबाबदाऱ्या सांभाळून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश समाजापुढे जाण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी रूपाली बिल्ला, शारदा मंगलपेल्ली, योगिता गावकरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून रात्र शाळेत शिक्षणाची संधी व जीवनाची वाट सापडली आहे. तर शिक्षणाबरोबर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार महादेव राऊत यांनी मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचे मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, एस.एस.सी. प्रमुख शशिकांत गवस, गुरुप्रसाद पाटील, संदीप सूर्यवंशी, संस्थेचे मानद सचिव संजय जोशी आदी संचालकांनी प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवप्रसाद शिंदे, गजेंद्र गाडगीळ, अमोल कदम, उज्वला साठे, वैशाली दुराफे, संदेश पिपाडा, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनुराधा गायके, संदीप कुलकर्णी, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.