जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा
डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट बांधवांचे योगदान -डॉ. ज्ञानेश्वर काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त नागरिक आणि प्राण्यांसाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या फार्मासिस्ट बांधवांच्या सन्मान करण्यात आला. फार्मासिस्ट दिनाच्या कार्यक्रमात 40 वर्षे औषध व्यवसायात कार्यरत असलेले ज्येष्ठ फार्मासिस्ट अनिल गांधी, केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशन स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे आणि अभय मुथा यांना सन्मानित करण्यात आले.
जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा पूजा पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर काळे, उपाध्यक्ष डॉ. सतीश राजुरकर, राजेंद्र कटारिया, अमित धोका, डॉ. कार्तिक शिंगटे, अमित मुनोत, डॉ. विनय शाह आदी उपस्थित होते.
डॉ. ज्ञानेश्वर काळे म्हणाले की, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा या प्रमाणे डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट योगदान देत आहे. त्यांनी कोरोना काळात दिलेले योगदान न विसरता येणारे आहे. समाज निरोगी राहण्यासाठी व योग्य औषधी उपलब्ध करुन त्यांचे आरोग्य जपण्याचे काम फार्मासिस्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूजा पातुरकर म्हणाल्या की, सन्मानित करण्यात आलेले फार्मासिस्ट बांधवांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. त्यांनी जनावरांची मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, पूरग्रस्त आणि भूकंपग्रस्तांना मदत, करोना काळात दिवस रात्र दिलेली सेवा तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचे निस्वार्थपणे कार्य सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी युवती फार्मसिस्ट कु. स्वप्नाली बाजीराव दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जायंटस् ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य व फार्मसिस्ट बांधव उपस्थित होते.