श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
समाजाकडून मिळणारा सन्मान कार्यक्षमतेला बळकटी देतो -अमोल भारती
नगर (प्रतिनिधी)- केडगाव सरोदे नगर येथील श्री दत्त मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नगर महानगरपालिकेतील विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांचा, स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक अमोल भारती व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या सत्कार समारंभामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान ओसंडून वाहत होता.
कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता, सुट्टी न घेता सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. स्वच्छतेपासून ते स्मशानभूमीतील अंतिम सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी समाजासाठी केलेले योगदान वाखाणण्याजोगे होते. या कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम करीत श्री गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्टने त्यांच्या कार्याचा गौरव केला.
पोलीस उपाधीक्षक अमोल भारती म्हणाले की, “काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान झाला की त्याला पुढील कामासाठी प्रेरणा मिळते. समाजाकडून मिळणारा हा सन्मान त्याच्या कार्यक्षमतेला बळकटी देतो.” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरुदेव दत्त यांची महाआरती करून करण्यात आली. दर गुरुवारी महाआरती, महाप्रसाद व धार्मिक उपक्रमांचे आयोजन मंदिरात केले जाते. ट्रस्टचे अध्यक्ष महेश सरोदे यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्धापन दिनानिमित्त वृक्षवाटपाचा उपक्रम राबवण्यात आला असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात दिला जात आहे. मंदिर परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा ट्रस्टचा नेहमीच प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला रघुनाथ लोंढे, सोपान कारखिले, नामदेव चव्हाण, धनंजय जामगावकर, संस्थापक पोपटराव सरोदे, ट्रस्टचे अध्यक्ष महेश सरोदे, योगेश सरोदे, अभिनव लोंढे, आकाश जरे, मनोहर बगळे, हर्षद अंकुश, सागर कारळे, गोरख हुलगे, नवनाथ लोंढे, सचिन कोतकर, पांडुरंग कोतकर, न्यानेश्वर तोडमल, दत्ता भगत, रोहित गाडेकर, परमेश्वर आवटे, केदारे सर, बोरकर काका, प्रशांत गायकवाड, सचिन सरोदे, कृष्णकांत जरे, युवराज दळवी, आरती सरोदे, राणी सरोदे, मोनिका म्हस्के, संगीता जारे, स्वाती तांदळे, अनिता गीते आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.