भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर झाल्याबद्दल विशेष गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या या गुणगौरव सोहळ्यात सेवानिवृत्त सनदी अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. डॉ. विजयकुमार ठुबे, सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे, उपाध्यक्ष बाळकृष्ण काळे, संचालक मंडळातील किशोर मरकड, ज्ञानदेव पांडुळे, डॉ. कल्पना ठुबे, स्वाती जाधव, नंदिनी सोनाळे, तसेच राजेश परकाळे, उदय अनभुले, राजश्री शितोळे, सतीश इंगळे, प्रा. किसन पायमोडे, कालिदास शिंदे, डॉ. काशिनाथ डोंगरे, इंजि. संभाजी मते, द्वारकाधीश राजे भोसले, बाळासाहेब सोनाळे, ॲड. राजेश कावरे, निवृत्ती रोहकले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड आदी मान्यवर उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या माध्यमातून वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी अनेक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाचनालय चळवळ सुरु केली असून, मुलांमध्ये वाचनाची सवय निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.तसेच काव्यसंमेलन आणि साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवीं व साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य ते करत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीने त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी पुरुषोत्तम भापकर व उपस्थित मान्यवरांनी पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याचे कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. पै. नाना डोंगरे यांनी दरवर्षी संस्थेच्या वतीने विविध कार्याबद्दल होणारा सन्मान हा स्फुर्ती देणारा व सामाजिक कार्याला बळ देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.