• Sat. Nov 1st, 2025

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

ByMirror

Jun 17, 2024

शिक्षणात पुढे टाकलेले पाऊल माघारी फिरल्यास मोठे नुकसान -आ. संग्राम जगताप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कॉपी करणारे विद्यार्थी फक्त पास होतात, मात्र कष्टाने अभ्यास करुन मेरीटमध्ये येणारे विद्यार्थी आपले भवितव्य घडवितात. दहावी व बारावीनंतर आपले ध्येय स्पष्ट ठेऊन त्या दिशेने विचारपूर्वक वाटचाल करा. एकदा शिक्षणात पुढे टाकलेले पाऊल माघारी फिरल्यास मोठे नुकसान होते. स्वत:चे सामर्थ्य व आवड ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.


पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी व विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मानसोपचार तज्ञ व आयुर्वेदाचार्य डॉ. प्रसाद उबाळे, मार्कंडेय विद्यालयाच्या (श्रमिकनगर) मुख्याध्यापिका विद्या दगडे उपस्थित होत्या.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, गुणगौरवाने जीवनात ऊर्जा मिळते. चांगल्या वाईट गोष्टी जीवनात धडा शिकवतात. शिक्षण क्षेत्रातील पेपर फुटी व शिक्षणा पर्यंत पोहचलेले राजकारण समाजासाठी घातक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


डॉ. प्रसाद उबाळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या करियरची वाट सुस्पष्ट असावी. दिशा ठरवली नसेल तर तो विद्यार्थी भरकटला जातो. आपले करिअर निवडाल ते प्रामाणिकपणे व सचोटीने निवडून त्याच्यात यश प्राप्त करुन जीवन समृद्ध बनविण्याचे त्यांनी सांगितले. तर करियरचे पॅशन आणि पर्पज म्हणजे काय? हे स्पष्ट केले. विद्या दगडे यांनी मुलांना त्यांच्या जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यास प्रोत्सहन द्यावे. संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्या निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र त्यांच्यावर बिंबवावे. संकटाने खचून जाणारा विद्यार्थी आयुष्यातील आपले ध्येय गाठू शकणार नसल्याने त्याच्यात सामर्थ्य निर्माण करण्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ यांनी पद्मशाली स्नेहिता संघमच्या माध्यमातून मागील 23 वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामध्ये कधीही खंड पडलेला नसल्याचे स्पष्ट करुन त्यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.


पाहुण्यांचा परिचय रेखा वड्डेपेल्ली, आरती छिंदम, सविता कोटा यांनी करून दिला. याप्रसंगी अनिल अलवाल हे महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पीएसआयपदी रुजू झाल्याबद्दल व प्रसिध्दा बुरा एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिज्ञासा छिंदम, अथर्व मंगलारम यांनी सत्काराला उत्तर देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमासाठी रासकोंडा यांनी हॉटेल रेडियन्सचा हॉल उपलब्ध केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.


गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीसांसाठी प्रमिला चिलका, लक्ष्मी गुंडू, विजया गुंडू, श्रीलता आडेप, वाय. प्रकाश टेलर, एस.एस. कम्युनिकेशनचे प्रमोद गुंडू, विद्या दगडे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी 70 ते 80 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली चन्ना यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी वाचन रोहिणी पागा, सविता एक्कलदेवी, आरती छिंदम यांनी केले. आभार सचिव सपना छिंदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता एक्कलदेवी, विजया गुंडू, नीता बुरा, सुवर्णा पुलगम, सीमा अंकाराम, कांचन कुंटला, रेखा गुरूड, कल्पना बुलबुले, पुनम वन्नम, प्रमिला वन्नम, पूजा म्याना, सोनी लयचेट्टी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *