क्रीडा क्षेत्रातील कार्य व नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदीच्या निवडीबद्दल सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चोवीसाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शिव व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन किशोर मरकड, सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. शिवाजीराव देवढे, रजनी गोंदकर, युवा उद्योजक भाऊसाहेब जंजिरे, जयंत जाधव, सुजाता ठुबे, संपूर्णा सावंत, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, ज्ञानदेव पांडुळे, लक्ष्मणराव सोनाळे, राजश्री शितोळे, सतीश इंगळे, ॲड. काशीनाथ डोंगरे, ज्ञानेश्वर अनभुले, अशोक वाडकर, डॉ. कल्पना ठुबे, ॲड. राजेश कावरे आदी उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रात पै. नाना डोंगरे विविध संघटनेच्या माध्यमातून योगदान देत आहे. त्यांची नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी चौथ्यांदा फेरनिवड झाली आहे. ग्रामीण भागात विविध क्रीडा स्पर्धा घेऊन सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य ते करत आहे. त्यांच्या या कार्याची व झालेल्या नियुक्तीची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी डोंगरे यांच्या कार्याचे कौतुक करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.