महिलांनी एकत्र येऊन केला स्त्री शक्तीचा जागर
वाळुंज पब्लिक स्कूल आणि कृषी विद्यालयाचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) येथे सबाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठानच्या पब्लिक स्कूल आणि कृषी विद्यालय वाळुंज यांच्या वतीने महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता. सर्व महिलांनी या कार्यक्रमात एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर केला.

रामसत्य लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त छायाताई गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सबाजीराव गायकवाड, पब्लिक स्कूल वाळुंजच्या प्राचार्या सोनलताई गायकवाड, सरपंच पार्वती हिंगे, अर्चना म्हस्के, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत गायकवाड, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका प्राचार्य रूथ नायडू, प्राचार्या वृषाली तोडमल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
फुगड्यांचा फेर धरुन महिलांच्या वारीने या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमास प्रारंभ झाले. यामध्ये उखाणे स्पर्धा, रिंग फेकणे, फुगे फुगवणे आणि नाव घेणे यांसारखे खेळ खेळले गेले. उद्धव कालापहाड यांनी विविध स्पर्धा घेतल्या. रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाची पैठणी साडीचे बक्षीस निर्मला आजीनाथ दरेकर यांनी पटकाविले. तसेच या माधुरी साठे, मोनाली पासलकर, अश्विनी शिंदे, अश्विनी रोहकले, रितू राऊत या महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमास वाळुंजच्या पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांसाठी हा एक मनोरंजनात्मक आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला.
छायाताई गायकवाड म्हणाल्या की, प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. या कार्यक्रमातून तिच्या कलागुण वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. सोनलताई गायकवाड यांनी कुटुंब, नोकरी आणि विविध क्षेत्रात गुंतलेल्या महिलांना थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आल्याचे स्पष्ट केले. शालेय विद्यार्थिनी अद्विता टेकाळे व अक्षरा दरेकर यांनी स्त्री शक्तीवर भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक नामदेव लिंबोरे यांनी केले. आभार गणेश खुडे यांनी मानले.