• Sun. Jul 6th, 2025

हिंदुत्ववादी संघटनांनी बाबासाहेबांचा अपमान थांबवावा! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

ByMirror

Jul 6, 2025

बाबासाहेबांचे फोटो आणि जय भीमचे निळे झेंडे वापरणे बंद करावे -योगेश साठे


बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा झाकून ठेवला गेल्याने आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी; पुतळा उघडण्याचा इशारा!

नगर (प्रतिनिधी)- हिंदुत्ववादी संघटनांच्या स्टेजवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि जय भीमचे निळे झेंडे वापरण्यावर बंदी घालावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. शनिवारी (दि. 5 जुलै) शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. तर शहरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.


या बैठकीस जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष हनीफ शेख, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, जिल्हा सल्लागार जे. डी. क्षीरसाठ, युवक शहराध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार, हिंदुत्ववादी संघटना जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्या बॅनरवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरत असून, त्यांच्या नावे संविधानातील समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय या मुल्यांची पायमल्ली करीत आहेत. हे संपूर्णपणे बाबासाहेबांच्या विचारांविरोधात असून, त्यांनी लिहिलेल्या धर्मनिरपेक्ष घटनेला छेद देणारे आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या नागरिकांना एकत्र येऊन या प्रकारांना विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले की, हिंदू राष्ट्राची संकल्पना रेटणाऱ्या संघटनांनी बाबासाहेबांचा वापर थांबवावा. त्यांच्या विचारांचा वापर केवळ राजकीय लाभासाठी करणाऱ्यांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे. स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या नेत्यांना अमिष दाखवून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला जात आहे. या प्रवृत्ती समाजात जातीय तेढ आणि द्वेष पसरवत असून, भविष्यात यामुळे जातीय संघर्ष उद्भवण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.


नगर शहरात उभारण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अजूनही उघड न करता झाकून ठेवण्यात आलेला आहे. यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूत्ववादी विचारांचा अजेंडा घेऊन जाणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी घेतलेल्या बैठकीवर वंचित बहुजन आघाडी बहिष्कार टाकत असल्याची भूमिका मांडण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आदेश मिळताच समाजाच्या वतीने पुतळा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा खुला करण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *