• Tue. Jan 27th, 2026

निमगाव वाघातील हिंदू-मुस्लिम महिला भाविकांनी एकत्रित घेतले मोहटा देवीचे दर्शन

ByMirror

Oct 22, 2023

निमगाव वाघातून आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या देवी दर्शनास उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवीच्या दर्शनाला सर्व महिलांना एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथून आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला भाविकांना श्री क्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) दर्शन पाठविण्यात आले. या उपक्रमास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर मुस्लिम महिला देखील देवीच्या दर्शनाला रवाना झाल्या.


गावातून देवीच्या दर्शनाला सहा लक्झरी बस सोडण्यात आल्या. दरवर्षी प्रमाणे या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना मोफत मोहटा देवीचे दर्शन घडविण्यात आले. मोहटा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या बसचे पूजन ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, उद्योजक अरुण फलके, डॉ. विजय जाधव, अतुल फलके, राम पवार, सुभाष जाधव, किरण जाधव, बबन जाधव, संदीप डोंगरे, दिपक गायकवाड, रावसाहेब जाधव, भरत बोडखे, अनिल डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, बापू फलके, गणेश येणारे, मयुर काळे आदींसह गावातील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


महिलांना देवीला घेऊन जाणारे लक्झरी बसचे चालक वाल्मिक ठोंबरे, अरुण करांडे, अस्लम शेख, बबलू मचे, बाबासाहेब म्हस्के, चेतन माने यांचा ग्रामस्थांच्या वतीने नाना डोंगरे यांनी सत्कार केला. डोंगरे म्हणाले की, महिला वर्गाला आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून देवीच्या दर्शनाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे. महिलांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदू-मुस्लिम महिला एकत्रितपणे गेलेल्या देवी दर्शनातून गावातील धार्मिक एकता दिसून येत आहे. तर आमदार लंके यांनी देवी दर्शनाबरोबरच मुस्लिम महिला भाविकांसाठी खेड शिवापूर दर्गाला जाण्याची केलेली घोषणा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला भाविकांना श्री क्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) दर्शन घडविण्याचा उपक्रम सुरु आहे. सातव्या माळेला निमगाव वाघातील महिलांना देवीचे दर्शन घडविण्यात आले. महिला भाविकांना उपवासाचे फराळ, नाश्‍ता, पाणी बॉटल, फळे आदींची सोय करण्यात आलेली होती. तर महिलांना चांगल्या पद्धतीने मोहटा देवीचे दर्शन घडविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *