• Thu. Oct 16th, 2025

एकाच दिवशी आलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक व मोहंमद पैगंबर जयंती मिरवणुकीचा पेच अखेर सुटला

ByMirror

Aug 30, 2023

शहरात पैगंबर जयंतीची मिरवणुक निघणार 1 ऑक्टोबरला; मुस्लिम समाजाचा निर्णय

मुस्लिम समाजाने मनाचा मोठेपणा दाखवत घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- यावर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक (अनंत चतुर्दशी) व मोहंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलादुन्नबी) उत्सवाची मिरवणुक एकाच दिवशी 28 सप्टेंबर रोजी येत असल्याने हिंदू-मुस्लिम समाजाचे दोन्ही उत्सव शांततेत साजरा होण्याच्या उद्देशाने शहरातील तख्ती दरवाजा ईद मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने पैगंबर जयंतीचा उत्सवाची मिरवणुक रविवारी 1 ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक ऐक्य व जातीय सलोख्यासाठी मुस्लिम समाजाने मनाचा मोठेपणा दाखवत घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


हिंदू-मुस्लिम समाजाचे महत्त्वाचे सण एकाच दिवशी येत असल्याने व दोन्ही उत्सवाचा मिरवणुक मार्ग व वेळ एकच असल्याने पोलीस प्रशासनापुढे बंदोबस्ताचा मोठा पेच निर्माण झाला होता. शहरात धार्मिक एकता व सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेवून मोहंमद पैगंबर जयंती उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने तख्ती दरवाजा ईद मिलादुन्नबी कमिटी,मोहरम उत्सव समिती, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व यंग पार्टीचे प्रमुख व धर्मगुरू यांच्या उपस्थितीमध्ये तख्ती दरवाजा मशिदीमध्ये बैठक पार पडली.


या बैठकीत 28 सप्टेंबरला मोहंमद पैगंबर जयंती घरोघरी व मशिदीत साजरी करुन प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तर सार्वजनिक मिरवणुक रविवारी 1 ऑक्टोबरला काढण्याचा सर्वानुमते निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मोहंमद पैगंबर यांनी ईस्लाम धर्माला शांती व प्रेमाचा संदेश दिला असून, त्याचे विचार जीवनात आचरण करुन आणि समाजात शांतता व प्रेम अबाधित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तख्ती दरवाजा ईद मिलादुन्नबी समितीचे अध्यक्ष शेख अब्दुल कादिर व मोहरम उत्सव समितीचे अध्यक्ष हाजी करीमभाई हुंडेकरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *