• Mon. Oct 27th, 2025

ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपी संदीप गुडा यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

ByMirror

Jul 13, 2025

जिल्हा न्यायालयानंतर उच्च न्यायालयातही दिलासा नाही; आरोपींच्या अडचणीत वाढ

नगर (प्रतिनिधी)- ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपी संदीप गुडा याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय यांनी रद्द केला होता. यानंतर आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठांमध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने सदर आरोपीचा जामीन नाकारला आहे.


20 जून 2023 रोजी फिर्यादी ओंकार रमेश घोलप यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती, की 19 जून 2023 रोजी फिर्यादी हा गामा भागानगरे व इतर मित्रांसोबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन गणेश केरप्पा हूच्चे यांचे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत चालू असलेले अवैध धंद्याबाबत तक्रार केल्याने कोतवाली पोलिसांनी गणेश हुच्चे यांच्या अवैध धंद्यावर कारवाई केली. त्यावेळेस आरोपी गणेश हुच्चे यांनी तुमच्याकडे पाहून घेतो असे म्हणून निघून गेला होता.


19 जून 2023 रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास आरोपी नंदू बोराटे गाडी चालवीत व त्याच्या मागे गणेश हूच्चे व सोबत दुसऱ्या अजून एका गाडीवर संदीप गुडा हे तिघे बालिकाश्रम रोड येथे रुबाब कलेक्शन जवळ येऊन सदर गुन्ह्यातील आरोपींनी गामा भागानगरे याच्यावर तलवारीने सपासप वार करून खून केला होता. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदरील प्रकरणामध्ये तोफखाना पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी संदीप गुडा, गणेश हुच्चे, नंदू बोराटे व इतर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.


सदरील दोषारोप पत्रामध्ये तपासी अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज चलचित्र पंचनामा जोडलेला होता. त्याचप्रमाणे आरोपींचे मोबाईल संभाषण देखील तपासामध्ये निष्पन्न झाले होते. सदरील प्रकरणात आरोपी संदीप गुडा याने शुभम पडोळे यांना तलवारीने मारहाण केली. यामध्ये आरोपी असलेले गुडा याचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्याने त्याच्या वतीने औरंगाबाद खंडपीठांमध्ये जामीन अर्ज दाखल केला होता.


सदरील प्रकरणांमध्ये मूळ फिर्यादी घोलप यांच्या वतीने ॲड.एन.बी. नरवडे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास चलचित्र पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, मोबाईल संभाषण व इतर सबळ पुरावे निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने आरोपी पक्षाचे, मूळ फिर्यादीचे व सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दर्शविला. आरोपीने सदरचा अर्ज पाठीमागे घेतला. या प्रकरणामध्ये फिर्यादीतर्फे ॲड. एन.बी. नरवडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *