महिलांना आरोग्याचा वाण
आनंदी सहजीवनात पती-पत्नीचे चांगले संबंध महत्त्वाचे -डॉ. अंशू मुळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडीतील आंनद योग केंद्रात दरवर्षी प्रमाणे हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिलांना आनंदी सहजीवनविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सुखी सहजीवनासाठी आणि सुखी संसार घडविण्यासाठी कुटुंबातील महत्त्व विशद करण्यात आले. या कार्यक्रमातून महिलांना आरोग्याचे वाण देण्यात आले.
आयुर्वेद तज्ञ डॉ. अंशू मुळे यांनी आनंदी सहजीवनविषयक विचार मांडले. सुखी सहजीवनासाठी आणि सुखी संसार घडविण्यासाठी कुटुंब महत्त्वाचे असून, त्याचा पाया उत्तम सहजीवनावर आधारलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
पती-पत्नीचे संबंध शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आध्यात्मिक स्तरांवर आधारित असतात. पुरुष आणि स्त्री यांच्यात एक सुंदर व रंजक अशी साखळी निर्माण होते. स्त्री भावनात्मक तर पुरुष तर्कशुद्ध व तार्किक असतो. स्त्रियांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल होत असतात. मुलीच्या वयात आल्यानंतर होणारे शारीरिक व मानसिक बदल, लग्नानंतर अचानक बदललेले जग, तसेच संततीबाबत होणारे शारीरिक व हार्मोन्ससंबंधी बदल यांचा त्यामध्ये समावेश होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आनंदी सहजीवनात पती-पत्नीचे संबंध कसे असावेत, हे दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन जपले पाहिजेत या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी वैवाहिक आयुष्यात आनंद निर्माण केला पाहिजे. पती-पत्नीचे संबंध चांगले असावेत आणि त्यातून होणारे मानसिक व शारीरिक लाभ समुपदेशनाच्या माध्यमातून कशाप्रकारे साध्य करता येतात, हे स्पष्ट केले आहे. लैंगिक संबंध ही दुर्लक्षित बाब नसून ती आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची कडी आहे, हे अधोरेखित केले आहे. स्तनाचे, गर्भाशयाचे वाढलेले कॅन्सरचे प्रमाण, त्यासाठी नियमित चाचण्यांबद्दल उपयुक्त माहिती दिली. नियमित प्राणायाम, योगाने आत्मविश्वास व सकारात्मकता वाढते.
अलका कटारिया यांनी पाहूण्यांचा सत्कार केला.अपेक्षा संकलेचा यांनी मनोरंजनात्मक व बौद्धिक स्पर्धा घेतल्या.या कार्यक्रमासाठी पूजा ठमके, रेखा हाडोळे, उषा पवार, सोनाली जाधवर,प्रतिक्षा गीते, संगीता जाधव,रुपाली रिक्कल,स्मिता उदास, वैशाली कटारिया यांनी परीश्रम घेतले.
