प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
निवड झालेल्या दिव्यांग आरोग्य सेवकाला सेवेत न घेतल्यास तीव्र आंदोलन -ॲड. लक्ष्मण पोकळे
नगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवक 50% दिव्यांग हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत रुजू करण्याचे आदेश पारित करण्याची मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवड झालेल्या दिव्यांग आरोग्य सेवकास सेवेत तात्काळ समाविष्ट करून घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती सन 2023 घेण्यात आलेली आहे. दिव्यांग बांधवांवर अन्याय झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. आरोग्य सेवकाच्या (पुरुष) एकूण सात जागा होत्या. दिव्यांग प्रकार अ 2, ब 2, क 1 आणि इ+ड या दोन जागा असताना एक उमेदवार पात्र ठरला. तर एक जागा रिक्त राहिली. वाढत्या बेरोजगारीचा विचार करून ती जागा रिक्त न ठेवता व सामान्य उमेदवारांना न देता आणि अधिनियम कायदा 2016 नुसार कलम 34 चा भंग न करता ज्या प्रकारात कमी जागा होत्या त्या दिव्यांगानाच देण्यात याव्या. म्हणजे दिव्यांग आरक्षणाचा कुठेही भेदभाव होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अस्थिव्यंग प्रकारला एकच जागा होती, तर त्यांना पण त्या जागेत समप्रमाणात घ्यावे. ज्यांची अंतिम निवड 9 जून रोजी करण्यात आलेली आहे. अशा निवड झालेल्या दिव्यांग आरोग्य सेवकास तात्काळ समाविष्ट करून घेण्याचे निवेदनात म्हंटले आहे.