माहेर फाउंडेशनचा उपक्रम
सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्वत संपत्ती आहे -ह.भ.प. नामदेव महाराज खुळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्वत संपत्ती आहे. नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होते तर बाह्य शरीरासाठी आरोग्य जपणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्यासाठी दिंडीच्या माध्यमातून प्रसन्नता लाभते. सेवा ही ईश्वराला देखील भावते. दिंडीच्या माध्यमातून सेवाभाव दिसून येतो, असे प्रतिपादन ह.भ.प. नामदेव महाराज खुळे यांनी केले.
आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या निवृत्ती महाराजांच्या दिंडीचे (21 नंबर दिंडी) शहरात स्वागत करुन डीएसपी चौक येथील शासकीय बंगल्यांच्या प्रांगणात वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन प्राथमिक उपचाराचे औषध किट भेट देण्यात आले. यावेळी नामदेव महाराज खुळे बोलत होते. जिल्हा क्रीडा कार्यालय युवक कल्याण योजनेअंतर्गत माहेर फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, अशोक खुळे, पोपट सईद, सुनील मवाळ, माहेर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा रजनी ताठे, विश्वास खुळे, दशरथ खुळे, सुनीता सईद, मनीषा खुळे, प्रियंका ताठे, पोपटराव बनकर, उषाबाई भाळणकर, पुनम ताठे, अलका खुळे, जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. अर्चना धिरडे आदी उपस्थित होत्या.
रजनी ताठे म्हणाल्या की, सुदृढ आरोग्यासाठी दररोज व्यायाम, योग करणे गरजेचे आहे. मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवा गोरगरिबांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य माहेर फाउंडेशन करत आहे. वारकऱ्यांच्या सेवेतून मोठे समाधान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, दिपाली बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी रावसाहेब काळे, पोपट बनकर, आरती शिंदे, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. धनाजी बनसोडे, अश्विनी वाघ आदींनी परिश्रम घेतले.
