मोफत उपचारासाठी प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची देण्यात आली माहिती
प्राईम केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एकता फाऊंडेशनचा उपक्रम
गंभीर आजार झाल्यानंतर घाबरण्याची गरज नसून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा -अतुल फलके
नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागाच्या वाडी-वस्तीवरील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळण्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यासंबंधी असलेल्या योजनेची माहिती देण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे मोफत आरोग्य शिबिर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पाईपलाईन रोड येथील प्राईम केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि एकता फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या शिबिरास गावातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देण्यात आली.
या शिबाराप्रसंगी डॉ. उल्हास राठोड, ब्रदर रोहिदास लबडे, रवी सोनवणे, प्रवीण शिंदे, उपसरपंच किरण जाधव, माजी सरपंच अनिल डोंगरे, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सोसायटीचे सदस्य अतुल फलके, विजय गायकवाड, संदीप गायकवाड, संभाजी पाचारणे, अनिल रक्ताटे, नवनाथ फलके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. उल्हास राठोड म्हणाले की, ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने आरोग्याच्या योजना पोहचण्याची गरज आहे. आरोग्यासह शासनाच्या आरोग्यासंबंधी असलेल्या योजनांची त्यांना माहिती झाल्यास त्याचा त्यांना लाभ घेता येणार आहे. आर्थिक अडचणीमुळे गंभीर आजार असताना देखील ग्रामस्थ उपचारासाठी पुढे येत नाही. मात्र प्रधानमंत्री व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून सर्व शस्त्रक्रिया व उपचार मोफत होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अतुल फलके म्हणाले की, महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना हॉस्पिटल मधील खर्चिक आरोग्य सुविधा घेणे परवडत नाही. वेळोवेळी तपासणीला पैसे नसल्याने इच्छा असताना देखील सर्वसामान्य घटकातील ग्रामस्थांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये विविध आरोग्य शिबिर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. भविष्यातील गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्यक आहे. तर एखाद्याला गंभीर आजार झाल्यानंतर देखील घाबरण्याची गरज नसून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सर्व उपचार मोफत होतात. मात्र यासाठी त्या योजनांची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी एक आरोग्य विमा योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला उत्तम आरोग्य सेवांची सुविधा पुरवणे आहे. या योजनेमध्ये विविध प्रकारच्या उपचारांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयात उपचार घेत असताना 5 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये शस्त्रक्रिया, उपचार, औषधे आणि इतर आरोग्य सेवा समाविष्ट आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी ही योजना आधार ठरत आहे.
तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ही भारत सरकारची एक महत्त्वाची राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आहे. या योजनेचा उद्देश गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उच्च गुणवत्तेच्या आरोग्य सेवा पुरविणे आहे. यामध्ये कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण दिले जाते, ज्याद्वारे ते महागड्या उपचारांचा खर्च परिपूर्णपणे किंवा भागीदार रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे करु शकत असल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.