राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
सक्षम समाजासाठी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार -भास्कर हांडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त उमेद सोशल फाऊंडेशन, जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बोल्हेगाव, गांधीनगर येथील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्तगट तपासणी करण्यात आली. तर विद्यार्थी व पालकांना मानसिक व शारीरिक आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
मनपाच्या कै. बाळासाहेब केशव ठाकरे प्राथमिक शाळेत झालेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्तगट तपासणी शिबिराचे उद्घाटन भास्कर हांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काकासाहेब म्हस्के शाळेच्या मेडिकल ऑफिसर किरण वैराळ, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, मंजूश्री बागडे, उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, विजय लोंढे, रवींद्र साखरे, योगेश घोलप, प्रकाश भालेराव, आरती शिंदे, ढोबळे दादा, अरुण वाघमारे, ॲड. दीपक धीवर, शाळेचे मुख्याध्यापक अक्षय सातपुते, सिमा म्हस्के, सुरेखा घुले, प्रीती जाधव, गयाबाई गिते, वर्षा दिवे, योगेश राजळे, सुनील रोटे, काकासाहेब म्हस्के कॉलेजचे रेवण गिते, शुभांगी बोठे, कोमल ढोरमारे, प्राजक्ता अडसूळ, रोशनी मासुळे, अलंकार खेडकर, रुपेश काळे, पवन निमसे, नागेश जोगदंड, महेश शिंदे, शबनम आदी उपस्थित होते.
किरण वैराळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी मानसिक व शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असून, या दृष्टीकोनाने पालकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी मार्गदर्शन केले.
भास्कर हांडे म्हणाले की, सक्षम समाज घडविण्याच्या उद्देशाने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य असून त्यांच्या आरोग्यासाठी उमेद सोशल फाऊंडेशनने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. महेश शिंदे यांनी सदृढ आरोग्याने समाजाची विकासात्मक दिशेने वाटचाल होणार आहे. समाजाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अक्षय सातपुते यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने राबविण्यात आलेल्या शिबिराची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती जाधव यांनी केले. आभार गयाबाई गीते यांनी मानले.