पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्कचे कुटुंबीयांसह उपोषण
त्रास देण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक रुजू करुन घेतले जात नसल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- निलंबन रद्द करूनही पुन्हा कामावर रुजू करुन घेत नसल्याने पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्क नितीन मेहेर यांनी कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. तर चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने समानसंधी नाकारून अन्याय करत असल्याचा आरोप मेहेर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्क नितीन मेहेर यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांच्या बरोबरचे निलंबित झालेले सर्व कर्मचारी यांना वशिलेबाजी करून पुन्हा कामावर हजर करुन घेतले. मेहेर यांना अद्यापि कामावर रुजू करुन घेतलेले नाही. निलंबन रद्द होऊनही कामावर चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमत करुन कामावर रुजू करुन घेतलेले नाही. जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने अन्याय केला जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
बँकेतून निलंबन केल्याने कुटुंबाच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नोकरी हाच एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने नोकरीवर रुजू करुन घेतले जात नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेतून निलंबित केलेल्या इतर अधिकारी, कर्मचारी प्रमाणे पुन्हा रुजू करुन घ्यावे, निलंबन काळात कोणताही उदरनिर्वाह भत्ता अथवा पगार दिलेला नसून, तो त्वरित देण्यात यावा, निलंबन रद्द झाल्याने न दिलेला पगार 50 टक्के बँकेने त्वरीत देण्याची मागणी मेहेर कुटुंबीयांनी केली आहे.