• Wed. Jul 2nd, 2025

चिचोंडी शिराळचा तो होमिओपॅथिक डॉक्टर करतोय रुग्णांवर ॲलोपॅथीचे उपचार

ByMirror

Sep 25, 2024

पिडीत रुग्णांची जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु

त्या डॉक्टराचा परवाना रद्द करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- होमिओपॅथिक डॉक्टर असताना रुग्णांची फसवणूक व दिशाभूल करुन चूकीच्या पध्दतीने ॲलोपॅथीचे उपचार करणाऱ्या चिचोंडी शिराळ (ता. पाथर्डी) येथील त्या डॉक्टरवर कारवाई करुन गुन्हे दाखल करुन त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी पिडीत रुग्णांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास 25 सप्टेंबर पासून जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा विवेक आटपाडकर, मंदा आटपाडकर व पिडीत रुग्णांनी दिला आहे.


चिचोंडी शिराळ (ता. पाथर्डी) येथे होमिओपॅथिक डॉक्टर असलेला व्यक्ती रुग्णांच्या जीवाशी खेळून ॲलोपॅथीचे उपचार करत आहे. डीफार्मसीचा पदवीधर नसताना स्वतःच्या दवाखान्यामध्ये बेकायदेशीरपणे ॲलोपॅथीचे मेडिकल चालवीत आहे. रुग्णांची तपासणी करून होमिओपॅथीचे औषध देण्याऐवजी प्रिस्क्रिप्शनवर ॲलोपॅथीच्या गोळ्या औषध लिहून देत, स्वत:च्या मेडिकल मधून गोळ्या आणून देतो. हा प्रकार एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


तक्रारदार आटपाडकर पती-पत्नी उपचारासाठी गेले असता त्यांनी सदर डॉक्टराने ॲलोपॅथीचे औषधे दिले व शिरेतून इंजेक्शन आणि सलाईन दिली. सलाईनद्वारे औषधे देखील सोडली. त्यामुळे अनेक प्रकारचे रोग जडल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
याप्रकरणी मौजे चिचोंडी शिराळ ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक तसेच अन्न औषध प्रशासनाकडे कारवाई करण्याची तक्रार केलेली आहे.

मात्र हा डॉक्टर राजकीय बळाच्या जोरावर सर्व प्रकार दाबून बिनधास्तपणे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करून रुग्णांच्या जीवितास खेळत आहे. परिसरातील एक शेतकरी देखील या डॉक्टराच्या चूकीच्या उपचाराने दगावला असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. सदर डॉक्टराचा परवाना रद्द करुन त्याच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी पिडीत रुग्णांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *