पंजाबी राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन
फुलांच्या होळीचा रंगला सोहळा
नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा! अशा हनुमान चालीसा पठनाने व विविध भाव-भक्ती गीतांनी शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिराच्या (ट्रस्ट) प्रांगणात हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचा कार्यक्रम रंगला होता. या धार्मिक कार्यक्रमासाठी शीख, पंजाबी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाच्या सदस्यांनी या भजन संध्येच्या कार्यक्रमात रंग भरला होता. संपूर्ण परिसर या सोहळ्याने भक्तीमय बनला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर, या हनुमान चालीसाच्या विविध चालीतील गायनाने कार्यक्रमात भक्तीचे रंग उधळले. नागरिकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भक्तीगीतांवर ठेका धरला होता. हनुमान चालीसा गायन व विविध भजने, भक्ती गीतामध्ये उपस्थित भाविक तल्लिन झाले होते.
बोल सियाराम चंद्र की जय…, जय जय सिया राम…, जय जय राम जय श्रीराम… सीने मे मेरे सिताराम बसते… अशा भक्ती गीतांनी ही भजन संध्या उत्तरोत्तर रंगली. राम सियाराम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की… या भजनानेही भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमात फुलांची होळी खेळण्यात आली. भाविकांनी एकमेकांवर फुलांचा वर्षाव केला.
हनुमानजीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. आरतीचा मान प्रदीप सचदेव परिवाराला देण्यात आला होता. हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी संगीता ॲबट यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा श्रीमती विमलादेवी धुप्पड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पंजाबी समाजाचे अध्यक्ष प्रदीप पंजाबी यांच्या हस्ते श्री लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाच्या सदस्यांचा सत्कार प्रातिनिधिक स्वरुपात झाला. भाविकांचे स्वागत करुन ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी आभार मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतले.