काच-कागद गोळा करणाऱ्या महिलांना साडी, चोळी व फराळ भेटचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याच्या उद्देशाने यावर्षीही ज्ञानरचना सोशल फाउंडेशन (कल्याण-ठाणे) क्षेत्रीय कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने सोमवारी (दि.27 ऑक्टोबर) वंचितांची दिवाळी उपक्रम राबविण्यात येणार आहे. वंचितांची दिवाळी या संकल्पनेतून दिवाळीच्या उत्सवात सामाजिक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न फाउंडेशनने केला आहे. काच, कागद व भंगार गोळा करून उदनिर्वाह करणाऱ्या महिलांना साडी-चोळी आणि दिवाळी फराळ भेट देण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, सारिका मावळे व संचालक प्रविण साळवे यांनी दिली.
सालाबादप्रमाणे संस्थेच्या वतीने वंचितांची दिवाळी गोड करुन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात येत असतो. या वर्षी संस्थेच्या वतीने अहिल्यानगर शहर आणि उपनगर परिसरातील काच, कागद व भंगार गोळा करून उदनिर्वाह करणाऱ्या महिलांना साडी-चोळी आणि दिवाळी फराळ भेट देण्यात येणार आहे. या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा आणि त्यांच्या सणातही प्रकाश व गोडवा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला आहे.
संस्थेच्या वतीने या उपक्रमासाठी सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने दिवाळीचा आनंद वाटण्यात हातभार लावावा, अशी अपेक्षा संस्थेच्या संचालिका सुप्रिया चौधरी यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, आपल्या छोट्याशा योगदानातून कुणाच्या तरी आयुष्यात दिवाळी उजळू शकते, हेच वंचितांची दिवाळीचे सार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इच्छुक व्यक्तींनी सामाजिक सहभागासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे किंवा आर्थिक सहयोग देऊन या कार्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9021066491 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
