प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
निरोगी जीवन हीच आजच्या युगातील सर्वोत्तम संपत्ती -कल्पना ठोकळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी जीवन हीच आजच्या युगातील सर्वोत्तम संपत्ती आहे. पैश्याने आरोग्य कमावता येत नाही. जीवनभर कष्ट करुन पैसा कमवायचा आणि आरोग्य बिघडवून तो खर्च करायचा. यामुळे जीवनातून जगण्याचा आनंद लुप्त होतो. निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी व्यायाम व सकारात्मक विचारांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महिला पतंजली योगच्या राज्य कार्यकारिणी सदस्या कल्पना ठोकळ यांनी केले.
प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी योग-प्राणायामातून आनंदी जीवन या विषयावर ठेवण्यात आलेल्या व्याख्यानात ठोकळ बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समिती भारत सन्मानचे अध्यक्ष अविनाश ठोकळ, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, सावेडी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, उपाध्यक्षा उषा सोनी, संचालिका उषा सोनटक्के, सविता गांधी, जयश्री पुरोहित, मेघना मुनोत, नीलिमा पवार, वंदना गारुडकर, रेखा फिरोदिया, उज्वला बोगावत आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या.
पुढे ठोकळ म्हणाल्या की, विचारांवर आपण काम केल्यास दुःख विसरून जातो. दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होताना आपण जास्त आनंद राहू शकतो. दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या जावनातील दु:ख देखील कमी होत असल्याचे स्पष्ट करुन आयुर्वेदचे महत्त्व सांगितले.
अविनाश ठोकळ म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात धावपळ व तणाव असून, तणावमुक्त व निरोगी जीवनासाठी योगाचा स्विकार करण्याची गरज आहे. योगाने निरोगी आरोग्य मिळून आनंदी जीवनाचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध बौध्दिक व मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मीरा पोफलिया, सीमा बंग, संगीता देशमुख, सविता धामट, वर्षा वाबळे यांनी बक्षिसे पटकावली. उषा सोनटक्के यांच्या वतीने विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा भालसिंग यांनी केले. नीलिमा पवार यांनी आभार मानले.
