फटाक्यांच्या आतषबाजीत मराठा आरक्षणाचा जल्लोष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले -अनिल शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले. कोणालाही जमले नाही, असा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. नुकतीच झालेली स्व. बाळासाहेब ठाकरे यांची झालेली जयंती व स्व. आनंद दिघे यांच्या जयंती दिनी घेतलेला निर्णय दुग्धशर्करा योग आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाने राज्यातील संपूर्ण मराठा समाज आनंदी असून, जल्लोष साजरा होत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.

शहरात शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात जिल्हाप्रमुख शिंदे बोलत होते. जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, युवकचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, रणजीत परदेशी, आशिष शिंदे, संदीप सप्रे, ओंकार शिंदे, प्रदीप कोरडे, तालुकाप्रमुख अजित दळवी, दामोदर भालसिंग, अतुल भंडारी, सुनिल गमे, विनोद शिरसाठ, रोहित पाथरकर, गणेश कचरे, अनिल साळवे, किरण भाकरे, अक्षय चुकाटे, राज कोंडके, प्रणील शिंदे, बाबासाहेब गेरंगे, भारत कांडेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी फटाक्यांची आतषबाजी करुन मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करुन स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आनंद दिघे अमर रहे…च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
सचिन जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा वारसा सक्षमपणे चालवत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. तर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महायुतीचे सरकार वाटचाल करत आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा क्रांतीकारक निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, स्व. आनंद दिघे बरोबर काम करण्याचे भाग्य लाभले. सर्व शिवसैनिकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून राजकारण केले पाहिजे. कोणालाही जमले नाही, असे आरक्षण महायुती सरकारने मराठा समाजाला दिले. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र एकनाथ शिंदे यांनी हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.