जिल्हाधिकारी यांचा आदेश
सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची होती तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप असलेल्या जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामपंचायत सदस्या सोनाली लष्करे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अबाधित ठेवण्याचा जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला आहे.
मौजे जलालपूर येथील प्रदीप नारायण काळे, लालासाहेब रामभाऊ काळे, शिवाजी गोपीनाथ काळे, वासुदेव विनायक बोराटे, यांनी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली नागनाथ लष्करे यांच्या विरुद्ध राजकीय द्वेषातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. यामध्ये तक्रारदारांनी सोनाली लष्करे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 1019 मध्ये अतिक्रमण करून राहत असल्याबाबत तक्रार दाखल करुन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.
परंतु सोनाली लष्करे या सदर मिळकतीत राहत नसल्याबाबतचा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी अहवाल सादर केलेला आहे. त्या जागेवर सदस्य कधीही राहत नसल्याबाबत अहवाल सादर करण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांनी सोनाली लष्करे यांनी सरकारी जागेत कधीही अतिक्रमण केलेले नसल्याचे स्पष्ट करुन तक्रारदारांचा अर्ज नामंजूर केला आहे. तर विद्यमान सदस्य सोनाली लष्करे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व कायम केलेले आहे. लष्करचे यांच्या वतीने ॲड. गजेंद्र पिसाळ यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विशाल पांडुळे, ॲड. अच्युत भिसे, निखील चव्हाण यांनी सहकार्य केले.