सामाजिक संघटनांच्या वतीने निमगाव वाघात सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील पदवीधर शिक्षक बाबासाहेब हरिभाऊ उधार यांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, प्रहार अपंग संघटना, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा सहसचिव संजय पुंड यांनी उधार यांचा गावात सत्कार केला. यावेळी राजू शिंदे, सुभाष पुंड, संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, बाबासाहेब उधार हे उपक्रमशील शिक्षक असून, त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यात आली असून, त्यांना मिळालेली पदोन्नती ही त्यांच्या कामाची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेब उधार हे नगर तालुक्यातील पांगरमल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होते. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची कोळगाव, सुरेगाव (ता. श्रीगोंदा) येथे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल उपस्थितांनी त्यांना ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.