• Wed. Nov 5th, 2025

जुनी पेन्शनच्या देशव्यापी आंदोलनासाठी शहरातून सरकारी कर्मचारी रेल्वेने दिल्लीला रवाना

ByMirror

Nov 1, 2023

शुक्रवारी रामलीला मैदान ते संसद भवनावर निघणार मोर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करावा व सर्वांना जुनी पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.3 नोव्हेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदान ते संसद भवन पर्यंत होणाऱ्या देशव्यापी रॅलीसाठी शहरातून समन्वय समितीचे पदाधिकारी, सदस्य व सरकारी कर्मचारी बुधवारी (दि.1 नोव्हेंबर) सकाळी रेल्वेने रवाना झाले.


अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे आंदोलकांना गळ्यात पुष्पहार टाकून आंदोलन यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आंदोलकांनी एकच मिशन जुनी पेन्शनच्या यावेळी जोरदार घोषणा दिल्या. शहरातून समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, विलास पेद्राम, विजय काकडे, भाऊसाहेब डमाळे, सुरेश जेठे, किरण आव्हाड, डॉ. मुकुंद शिंदे, सुधाकर साखरे, विजय काकडे, गिरीश गायकवाड, शिरसाठ, अरविंद वाव्हळ, आदींसह सरकारी कर्मचारी दिल्लीच्या आंदोलनासाठी गेले आहेत.


राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व शिक्षक, शिक्षकेतर, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या सर्व कामगार संघटना कर्मचाऱ्यांसह पीएफआरडीए कायदा रद्द करावा व सर्वांना जुनी पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी रामलीला मैदान ते संसद भवन पर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. लाखोंच्या संख्येने राज्य व केंद्रातील सरकारी कर्मचारी व शिक्षक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला निघाले आहेत.


राज्य शासनाने जुनी पेन्शन करिता नेमलेल्या समितीने सहा महिने होऊनही अद्याप निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्‍वासन पाळलेले नाही. राज्य सरकारकडून सकारात्मक हालचाली होत नसल्याने राज्यातील शिक्षक, सरकारी कर्मचारी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. दिल्लीच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 नोव्हेंबर रोजी मोर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे. शासनाने जुनी पेन्शन संदर्भात दखल घेतली नाही तर 14 डिसेंबर पासून कर्मचारी शिक्षक पुन्हा संपावर जाणार असल्याचा इशारा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *