हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणाची मागणी
जिल्हा प्रशासनाला निवेदन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हैदराबाद गॅजेटनुसार गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गोर बंजारा एसटी आरक्षण कृती समितीच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सर्व समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना निवेदन दिले. यावेळी प्रभाकर पवार, आर.के. चव्हाण, मोहन जाधव, दुर्योधन जाधव, संजय पवार, रवींद्र पवार, धोंडीराम पवार, रामभाऊ राठोड, विजय राठोड, लहू वडते, किसन चव्हाण, संजय चव्हाण, किशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गोर बंजारा समाज हा शिस्तप्रिय, दयाळू व राष्ट्रनिष्ठ समाज आहे. देशभरात आपली निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी हा समाज ओळखला जातो. समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी शांततामय आणि संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता क्लेरा ब्रूस मैदान येथून सुरू होईल. एसबीआय चौक, कोठला मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या जातील.
मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कोणतेही अनैतिक कृत्य होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी समाजबांधव देखील प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मोर्चासाठी गोर बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.