विराजची राष्ट्रीय स्पर्धेत निवड, तर क्षितिज ऑल इंडिया रँकिंग मध्ये ठरला प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय विदयालयाच्या राष्ट्रीय स्पर्धा बेंगलोर (कर्नाटक) येथे उत्साहात पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे खेळाडू विराज पिसाळ व क्षितिज पिसाळ या बंधूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सुवर्ण कामगिरी केली आहे. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 व 2 जलाहल्ली, बेंगलोर (कर्नाटक) ही स्पर्धा पार पडली. यामध्ये एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने 45 किलो वजन गट, 17 वर्षा आतील वयोगटात सुवर्णपदक पटकाविले. मध्यप्रदेश येथे होणाऱ्या स्कूल गेम्स् फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. तर त्याचा लहान भाऊ क्षितिज गजेंद्र पिसाळ याने 27 किलो वजन गट, 14 वर्षा आतील वयोगटात कास्य पदक मिळवले. तर नाशिक येथे पार पडलेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स फायनल तथा एशियन ट्रायल्स या स्पर्धेत क्षितिज याने सुवर्णपदक पटकावत ऑल इंडिया रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.
या दोन्ही खेळाडूंचे केंद्रीय विद्यालय क्र.1 अहमदनगरच्या प्राचार्या श्रीमती पूजा सिंग, क्रीडा शिक्षक राजकुमार परदेशी व आशु सर यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना प्रशिक्षक गणेश वंजारे, अल्ताफ खान, मंगेश आहेर, योगेश बिचितकर, सचिन मरकड, सचिन कोतकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष घनश्याम सानप यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विराज व क्षितिज हे खेळाडू केंद्रीय विद्यालय क्र.1 अहमदनगर या शाळेचे विद्यार्थी असून, अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. गजेंद्र पिसाळ व रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका स्मिता पिसाळ यांची मुलं आहेत. तर अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अंबादास पिसाळ साहेब यांचे नातू आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.