छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघात रंगणार काव्यांची मैफल
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे होणाऱ्या चौथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गझलकार तथा कवी रज्जाक शेख यांची नियुक्ती करण्यात आली. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी चौथे काव्य संमेलन रंगणार आहे. यामध्ये नवोदित कवी व नामवंत कवींचा सहभाग असणार आहे.
डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा काव्य संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी कवी शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, आत्माराम शेवाळे, कवी आनंदा साळवे, बाळासाहेब कोठूळे, संजय वाघमारे, देवीदास बुधवंत, सरपंच सुदर्शन वाकचौरे, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
रज्जाक शेख यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान असून, लोकजागृतीचे कार्य ते करत आहे. गझलकार तथा कवी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. साहित्य क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची चौथ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.
काव्य संमेलनाच्या निवड समितीने एकमताने शेख यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी मंजूरी दिली. काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.