तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे गावात उत्साहात स्वागत
नवरात्रोत्सवा निमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. तर गावात तुळजापूरच्या देवीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंदिरात देवीची पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, सोसायटीचे माजी चेअरमन अंशाबापू फलके, गोरख फलके, ज्योती जाधव, जया पवार, गंगूबाई कापसे, वसंत फलके, पांडुरंग जाधव, शिवाजी जाधव, पै. संदीप डोंगरे, मयुर काळे, अर्चना काळे, कमल फलके, गुलाब कार्ले, अरुण कापसे, सुधीर येणारे, विजय पवार आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावापासून दिड किलोमीटर लांब डोंगराच्या पायथ्याला जगदंब मातेचे मंदिर असून, पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर या मंदिराचे जीर्णोध्दार करण्यात आले आहे. जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती असून, नवरात्रोत्सवा निमित्त मंदिरात पंचक्रोशीतील भाविक दर्शनास येतात. नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवरात्रोत्सवात महिला सक्षमीकरण, मोफत आरोग्य शिबिर, मुलगी वाचवा… मुलगी शिकवा आणि युवकांसाठी व्यसनमुक्तीवर जनजागृतीवर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.
