गरजूंनी घेतला मनसोक्त मसाला दुधाचा आस्वाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गरजू घटकांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयात कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दुबळ्या घटकांना मसाला दूधाचे वाटप करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटक असलेल्या नागरिकांचे सर्व सण-उत्सव गोड करण्यात येते. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला. लंगर सेवेचे अन्न छत्रालय सुरु झाल्यापासून दर पौर्णिमेला एका व्यक्तीच्या गुप्तदानातून गरजूंना गोड मिष्टान्न भोजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
तसेच घर घर लंगर सेवेच्या सामाजिक उपक्रमात योगदान देणारे ठाकुरशेठ नवलानी, राकेश गुप्ता व ज्ञानशेठ नवलानी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, प्रशांत मुनोत, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, राजू जग्गी, चिंतामणी, गौरव नवलानी आदींसह लंगर सेवेचे सेवादार उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, सर्वच सण-उत्सवाचा आनंद घेत असतात, दुर्बल घटकांना देखील हा आनंद मिळावा व त्यांचा सण-उत्सव गोड करण्याच्या उद्देशाने या पध्दतीने लंगर सेवा उपक्रम राबवित आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेल्या या सेवेला सर्वसामान्यांचा प्रतिसाद व देणगीदारांची देखील साथ लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हरजितसिंह वधवा म्हणाले की, गरजूंना पोटभर जेवणाचे फुड पॅकेट देण्यासह त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम देखील लंगर सेवा करत आहे. नगरकरांनी दिलेल्या सहयोगामुळे ही सेवा अविरतपणे सुरु आहे. कोणीही उपाशी पोटी झोपू नये व प्रत्येकाला सण-उत्सवाचा आनंद मिळावा हाच एकमेव उद्देश ठेऊन लंगर सेवा योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोजागिरी पौर्णिमा आणि दूध हे समीकरणच आहे. कोजागिरी पौर्णिमेला जेवणाचे पाकिट घेण्यास आलेल्यांना जेवणाबरोबरच दूध मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. या गरजू घटकांनी मनसोक्त मसाला दुधाचा आस्वाद घेतला.
