• Sun. Feb 15th, 2026

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गायत्री खामकरने रौप्य पदक पटकाविल्याबद्दल सन्मान

ByMirror

Nov 20, 2025

प्रोत्साहन व योग्य प्रशिक्षण मिळाले तर महिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावतील -पै. नाना डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील महिला कुस्तीपटू कु. गायत्री शिवाजी खामकर हिने खोपोली (जि. रायगड) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नगर तालुका तालिम सेवा संघ, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेच्या वतीने तिचा सामाजिक कार्यकर्ते तथा तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोफ्लगरे यांनी सत्कार केला. यावेळी शिवाजी खामकर उपस्थित होते.


खोपोली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत 17 वर्षे वयोगट व 65 किलो वजन गटात गायत्रीने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच टक्कर दिली. तिच्या जिद्दी, ताकदी व कौशल्याच्या जोरावर तिने राज्य पातळीवरील स्पर्धेत रौप्य पदक मिळवून नेप्ती ग्रामवासीयांचा तसेच नगर तालुक्याचा मान उंचावला.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, गायत्री खामकर ही ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटू असून तिने आपल्या परिश्रमाने आणि चिकाटीने कुस्ती क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण केले आहे. तिची राज्यस्तरीय निवड ही अनेक मुला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे. कुस्ती हा केवळ खेळ नसून शिस्त, जिद्द, संघर्ष करण्याची वृत्ती आणि आत्मविश्‍वास वाढवणारा संस्कारक्षम खेळ आहे. नगर तालुका तालिम सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहोत. महिला कुस्तीपटूंना योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन मिळाले तर त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही नक्कीच देशाचं नाव उंचावतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल गायत्री खामकर हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *