ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटूची विभागीय स्तरावर निवड सर्वांना प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु. गायत्री शिवाजी खामकर हिचा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नगर तालुका तालिम सेवा संघ व पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते गायत्री खामकर हिचा सत्कार करण्यात आला.
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जंगले महाराज आश्रम, कोकमठाण (ता. कोपरगाव) येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत गायत्री खामकर हिने 17 वर्ष वयोगट व 65 किलो वजनगटात अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकाविले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, नेप्ती येथील महिला कुस्तीपटू असलेल्या गायत्री खामकर हिने आपले नाव कुस्ती क्षेत्रात उंचावले आहे. ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटू म्हणून तिची ही निवड प्रेरणादायी आहे. कुस्ती हा केवळ खेळ नसून गावागावातल्या मुला-मुलींमध्ये शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करणारा संस्कारक्षम खेळ आहे. नगर तालुका तालिम सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. महिला कुस्तीपटूंना योग्य संधी आणि प्रशिक्षण मिळाले तर त्या नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.