ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबध्द -हबीब शेख
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील भोयरे पठार येथील भाग्योदय विद्यालयात इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक हबीब शेख यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षक संजय गोसावी, भरत लगड, सतीश मुसळे, शिवाजी धस, रामदास साबळे, सुनिता दिघे, अशोक टकले, मनिषा वाटोळे सर्व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे नवीन गणवेश मिळाल्याने शालेय विद्यार्थी भारावले.
मुख्याध्यापक हबीब शेख म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने भाग्योदय विद्यालय कार्यरत आहे. विविध परीक्षेत शाळेचे विद्यार्थी गुणवत्तेमुळे चमकत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातील आनंद वाढविण्यासाठी आणि शिकण्याची गोडी टिकवून ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.