शिक्षक परिषदेची मागणी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील खाजगी, अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने निशुल्क प्रशिक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माजी शिक्षक आमदार नागो गाणार व नागपूर विभाग शिक्षक परिषदेच्या वतीने विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यातील खाजगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले. त्या शिक्षकांना वरिष्ठ/निवड वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला. परंतु प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ/निवड वेतनश्रेणीचा लाभ देय ठरला नाही. त्यांच्याकरिता शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये ऑनलाईन/ऑफलाइन प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत करणे अत्यावश्यक आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजुरीसाठी आवश्यक असणारे ऑनलाइन प्रशिक्षण प्रमाणपत्र नसलेले अनेक शिक्षक बांधवांना प्रस्ताव मंजूर होण्यासाठी बाधा निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता दहावी व बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कासह शिक्षक प्रशिक्षणाचे शुल्क घेण्यात येते. त्यामुळे शिक्षकांना निशुल्क प्रशिक्षण देणे शासन-प्रशासनाची जबाबदारी ठरते. सदर प्रशिक्षणाकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, असे निवेदनात म्हंटले आहे.
राज्यातील खाजगी, अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने निशुल्क प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी ऑनलाईन/ऑफलाइन प्रशिक्षण सुरू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची शिक्षक परिषदेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
