आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांची आर्थिक संपत्ती न पाहता, आरोग्य संपत्ती जपत आहे -डॉ. अशोक लोढा
हृदयरोगावर तज्ञ डॉक्टरांसह हॉस्पिटलची अद्यावत यंत्रणा सज्ज
नगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ आरोग्य सेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटलने सेवाभाव जपला आहे. या हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांनी आपल्या सेवेतून सर्वसामान्यांना विश्वास व आधार देण्याचे काम केले. हृदयरोगाच्या विविध शस्त्रक्रिया येथे अल्पदरात केल्या जात आहे. रुग्णांची आर्थिक संपत्ती न पाहता, आरोग्याची संपत्ती देण्याचे काम या आरोग्य मंदिरातून घडत असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक लोढा यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व.सौ. उज्वलादेवी अशोकलाल लोढा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राहाता येथील लोढा परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. लोढा बोलत होते. याप्रसंगी नरेंद्र लोढा, आनंद लोढा, राजेंद्र लोढा, मंगलताई लोढा, प्रकाश लोढा, धनेश लोढा, परेश लोढा, प्रिया लोढा, रुपाली लोढा, पार्थ लोढा, स्नेहा लोढा, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. अनिकेत कटारिया आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, राहता येथील डॉ. अशोक लोढा यांचे देखील सेवाभावाने आरोग्यसेवेचे कार्य सुरु आहे. डॉक्टर हा एक देवाचा रुप असल्याची प्रतिमा त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केली आहे. गोरगरीबांची सेवा करुन त्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. त्यांचे व्यक्तीमत्व आरोग्य क्षेत्रात नवीन पिढीला सेवाभावी कार्यासाठी ऊर्जा देणारे आहे. आजही त्यांची सेवा अविरत सुरु असून, त्यांच्याकडून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात लागलेला हातभार मोठ्या मदतीपेक्षाही अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अनिकेत कटारिया म्हणाले की, खर्चिक व अद्यावत सर्व आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत. अद्यावत ऑपरेशन थिएटर व तज्ञ डॉक्टरांची टीम 24 तास उपलब्ध असून, सर्वसामान्यांना आरोग्य सेवा दिली जात आहे. देशात हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलचे नाव देशात नावाजले असून, एन्जोप्लास्टीसाठी वेगळी कॅथलॅब उपलब्ध करण्यात आलेली आहे. दर महिन्याला लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात ह्रदयविकाराच्या यशस्वी शस्त्रक्रिया होत असल्याची त्यांनी माहिती दिली. डॉ. राहुल अग्रवाल म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वात जुने व अद्यावत हार्ट सेंटर म्हणून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून ह्रदय शस्त्रक्रिया मोफत होत असले, तरी त्याचा दर्जा उच्चप्रतिचा राखला जात आहे. इंम्पोर्टेड व उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरुन शस्त्रक्रिया होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात 125 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरातंर्गत गरजू रुग्णांवर बायपास सर्जरी, ह्रदयातील झडप बदलणे, छिद्र बुजवणे, लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया व ॲन्जिओप्लास्टी होणार असून, या शस्त्रक्रिया जनआरोग्य योजनेतून मोफत तर अल्पदरात केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.