• Sat. Nov 1st, 2025

महात्मा फुले जयंतीनिमित्त माळीवाडा येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Apr 12, 2024

जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम; प्रबोधनवर व्याख्यान, शाहीर गीत व पोवाड्यांनी रंगला कार्यक्रम

थोर समाज क्रांतिकारक महात्मा फुले बहुजनांचे उद्धारक -डॉ. पंकज जावळे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- थोर समाज क्रांतिकारक, बहुजनांचे उद्धारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवर कार्य करण्याची गरज आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी आपले आयुष्य समाजात समानता, न्याय, शिक्षण व समाजसेवेसाठी वेचले. या महापुरुषांच्या विचाराने समाजाला योग्य दिशा मिळणार आहे. त्यांची प्रेरणा घेवून समाज उपयोगी उपक्रम राबविणे परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नागरिकांसाठी मोफत रक्तगट, हिमोग्लोबिन, स्त्री आरोग्य तपासणी, निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आयुक्त जावळे बोलत होते. प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार संग्राम जगताप, प्रा. माणिक विधाते, सुहासराव सोनवणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, किशोर डागवाले, धनंजय जाधव, दत्ता जाधव, आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, प्रा. अशोक डोंगरे, रवी सातपुते, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, प्रकाश फराटे, रजनी ताठे, संभाजी कदम, विक्रम राठोड, प्रकाश डोमकावळे, डॉ. धनाजी बनसोडे, डॉ. संतोष गिऱ्हे, आरती शिंदे, शाहीर कान्हू सुंबे, अश्‍विनी वाघ, प्रकाश भागानगरे, विनोद साळवे, रावसाहेब काळे, सुनील सकट, चंद्रकांत पाटोळे, रेणुका पुंड, मनपा आरोग्य विभागाचे अंबिका चव्हाण, प्रशांत ठोंबरे, श्रद्धा कांबळे, नम्रता साठे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, विनायक नेवसे, रेश्‍मा आठरे, संगीता खिलारी, सुभाष आल्हाट आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमात प्रबोधनवर व्याख्यान, शाहीर गीत व पोवाडे रंगले होते. युवक कल्याण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जय युवा अकॅडमी सातत्याने वर्षभर विविध उपक्रम राबवून समाजातील गरजूंना आधार देत आहे. महापुरुषांच्या जयंतीदिनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचे कार्य घडत असून, तेच खऱ्या अर्थाने महापुरुषांना अभिवादन ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


भगवान फुलसौंदर यांनी महात्मा फुले यांची जयंती कृतीशील सामाजिक उपक्रमाने साजरी होत असल्याचा आनंद आहे. महात्मा फुले समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतिकारक होते. शिक्षणाची ज्योत प्रज्वलीत करुन त्यांनी सर्वांचे जीवन प्रकाशमय केल्याचे सांगितले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, सर्व महापुरुषांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. समता, न्याय व हक्कासाठी आपले आयुष्य वेचले. महापुरुषांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्याचा पायंडा जय युवा अकॅडमीने पाडला असल्याचे त्यांनी सांगितले. भरत खाकाळ यांनी महात्मा फुले यांचे जीवन कार्याने युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी समाज जागृती व गीतांच्या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याची गरज असल्याचे सांगितले.


यावेळी झालेल्या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. शाहीर कान्हू सुंबे, कारभारी वाजे, मंदाताई यांनी जनजागृतीवर पारंपारिक वाद्यासह पोवाडे व शाहिरी गीत सादर केले. महापुरुषांची पुस्तके देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे यांनी केले. आभार सुहास सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *